Menu Close

भारतद्वेषाचा ‘पुळका’ !

राजधानी देहली येथे साधारण ७२ दिवसांपासून चालू असलेले आंदोलन थांबण्याचे नाव घेत नाही. ‘सरकारने कृषी विषयांच्या संदर्भात ३ कायदे करून शेतकर्‍यांवर अत्याचार चालवले आहेत’, असे या कथित आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. अर्थात् याला सत्य मानणे, हे अयोग्यच म्हणावे लागेल. त्यामागील कारणेही तशी आहेत. जर हे कायदे शेतकरीविरोधी असते, तर ज्याप्रकारे पंजाब-हरियाणातील शेतकरी आंदोलने करत आहेत, तशा प्रकारे भारतभरातील प्रत्येक शेतकर्‍याने त्याच्या विरोधात आवाज उठवला असता. आंदोलनास अडीच मास होत आले, तरी तसे दिसत नाही. दुसरे असे की, शेतकर्‍यांनी चालू केलेल्या या आंदोलनात देशविरोधी शक्ती घुसल्या आहेत. खलिस्तानवादी संघटना, तसेच शाहीनबागमध्ये आंदोलन करणार्‍या धर्मांध संघटना यांनी या आंदोलनात उडी घेतली आहे. किंबहुना असे म्हणा की, मुळात हा सर्व प्रकार म्हणजे भारताला अस्थिर करण्याचा एक सुनियोजित कटच आहे. २६ जानेवारीला या आंदोलनकर्त्यांनी देहलीतील लाल किल्ल्यावर जो हैदोस घातला, त्यावरून हे भारताच्या मुळावरच उठलेले आंदोलन आहे, हे सूर्यप्रकाशासम स्पष्ट झाले.

असे असले, तरी या आंदोलनाला आता जागतिक पाठिंबा मिळत असल्याचे चित्र उभे करण्यात येत आहे. यामध्ये जगप्रसिद्ध पॉप गायिका रिहाना यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. ट्विटरवर रिहाना यांचे १० कोटींहून अधिक अनुयायी (फॉलोवर्स) आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे साडेसहा कोटी अनुयायी आहेत. त्यामुळे ‘अधिक प्रमाणात प्रसिद्ध असलेल्या रिहाना या आंदोलनकर्त्यांच्या बाजूने आहेत’, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांना न्यून दाखवण्यातच विरोधी लोक धन्यता मानत आहेत. यासह पॉर्न अभिनेत्री मिया खलिफा, तसेच कॅनडातील खलिस्तान समर्थक खासदार, अमेरिकेतील ५ खासदार, इंग्लंडच्या संसदेतील काही मूठभर खासदार यांनीही भारतविरोधी री ओढत शेतकर्‍यांचे हित(?) उचलून धरले आहे. बरं, भारतातील लक्षावधी शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या संदर्भात मात्र यांच्यापैकी आजपर्यंत कुणीही बोलले नसेल, हेही तितकेच खरे आहे. असो.

ग्रेटा थनबर्ग हिचे पितळ उघड !

देहलीतील आंदोलनाला जागतिक पाठिंबा मिळत असल्याच्या बातम्यांत एक रोचक गंमत पहा. गेल्या मासातच निवडणुकीत मत देण्याचा अधिकार प्राप्त झालेली, म्हणजेच १८ वर्षे पूर्ण केलेली आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी कथित लढा उभारणारी स्विडिश तरुणी ग्रेटा थनबर्ग हिनेही देहलीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. ‘भारत शासन मानवाधिकारांचे उल्लंघन करत आहे’, असे ग्रेटा हिचे म्हणणे आहे. येथे गंमत अशी आहे की, ग्रेटाने यासंदर्भात ट्वीट करतांना मात्र भारताच्या विरोधात जागतिक षड्यंत्र आखले गेल्याचे अनावधानाने का होईना, स्पष्ट केले आहे. तिने ट्वीट करत असतांना भारताला विरोध करण्यासाठी काय कृती करायच्या, यासंदर्भातील एक ‘टूल किट’च (कृती कार्यक्रमच) प्रसारित केली आहे. या ‘किट’मध्ये लोकांनी स्वत:ची भारतविरोधी भूमिका मांडणारा व्हिडिओ प्रसारित करावा, आपापल्या देशांतील भारतीय दूतावासासमोर आंदोलने करावीत, ४ आणि ५ फेब्रुवारीला ‘ट्विटर स्टॉर्म’ करून भारताचे वाभाडे काढण्यासाठी ट्वीट्स कराव्यात आदी कृतींचा स्पष्ट उल्लेख आहे. ‘गोरगरिबांवर अत्याचार करण्याचा भारताचा इतिहास राहिला आहे’, अशा प्रकारे भारतविरोधी गरळओक यामध्ये करण्यात आली आहे. मुळात ग्रेटा हिने कृषी कायद्यांचा अभ्यास तरी केला आहे का ?, हा प्रश्‍नच आहे. दुसरे असे की,  प्रत्येक हिवाळ्यात येथील शेतातील अनावश्यक पीक जाळत असल्याने शेजारील राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (‘एन्.सी.आर्.’मधील) कोट्यवधी जनतेला भयावह वायूप्रदूषणाचा सामना करावा लागतो. हे ग्रेटा का विसरते ? ‘पर्यावरणाच्या रक्षणासाठी विविध देशांतील राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान काहीच करत नाहीत’, अशा बाता मारून, त्यांना वेठीस धरून जागतिक प्रसिद्धी मिळालेल्या या तरुणीला कोट्यवधी लोकांचा जीव धोक्यात टाकणारे हे आंदोलनकर्ते जवळचे वाटतात, याला काय म्हणावे ? स्वतःचा देश स्वीडनपेक्षा तीन पटींनी अधिक असलेल्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील भारतीय नागरिकांचा विचार करू न शकणारी ग्रेटा म्हणे मानवाधिकारांचा विचार करणार ? यातून ग्रेटाला पर्यावरणाविषयी किती पुळका आहे, हेही समोर येते. एकूण काय, तर जगात नाव असलेल्या या वलयांकित लोकांनी स्वतःच्या प्रतिमेचा पुरेपूर वापर भारतविरोधी आरोळी ठोकण्यासाठी केला आहे. याद्वारे त्यांनी त्यांच्या बोलवत्या धन्याचे मन राखले आहे. यामुळे जरी गेल्या २ वर्षांत नामांकित होऊनही नोबेल पारिताषिकाची मानकरी ठरू शकली नसली, तरी येत्या १-२ वर्षांत ग्रेटा ‘नोबेल लॉरिएट’ बनल्यास कुणाला आश्‍चर्य वाटणार नाही !

राष्ट्रनिष्ठांचा संघटित प्रतिकार !

काँग्रेसने देशातील अंतर्गत विषयांमध्ये लुडबुड करणार्‍या थनबर्ग, रिहाना आदींना त्यांची जागा न दाखवता त्यांचे समर्थन केले आहे. यातून काँग्रेसची भारतविरोधी विचारधारा पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. असे असले, तरी भारत शासनाने या विरोधात आपली अधिकृत भूमिका मांडण्याआधीच देशातील लक्षावधी राष्ट्रनिष्ठ जनतेने या ‘प्रोपागंडा युद्धा’ला ट्विटरद्वारे कणखर प्रत्युत्तर दिले आहे. ३ फेब्रुवारी या दिवशी जेव्हा हे ‘आंतरराष्ट्रीय’ उपटसुंभ भारताचे वाभाडे काढत होते, तेव्हा लाखो नागरिकांनी यास तर्काच्या आधारे चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये अनेक प्रथितयश विचारवंत, कलाकार, खेळाडू, प्रशासकीय अधिकारी अशा सर्व स्तरांतील लोकांचा समावेश आहे. ‘हिंदू असहिष्णु आहेत’, असे म्हणून ‘पुरस्कार वापसी’चे नाटक करणारे, ‘भारतीय बलात्कारी आहेत’, अशा प्रकारचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील करण्यात आलेला अपप्रचार, ‘सीएए’च्या विरोधात शाहीनबागमध्ये धर्मांधांनी घातलेल्या हैदोसाला विदेशी हस्तकांचे मिळालेले समर्थन, अशा एक ना अनेक कटांना राष्ट्रनिष्ठ नागरिक पुरून उरले आहेत, हे या देशविघातक शक्तींनी विसरता कामा नये.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *