छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घेतली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट
सातारा : उत्तरप्रदेशमधील आग्रा येथे मोगल संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याची घोषणा उत्तरप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. त्यांच्या या निर्णयाविषयी छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट १३ वे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. तसेच त्यांना हिंदवी स्वराज्याची राजमुद्रा भेट दिली.
मराठा साम्राज्याचा इतिहास केवळ राष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला प्रेरणादायी – योगी आदित्यनाथ
या वेळी योगी आदित्यनाथ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून संपूर्ण देशाला गुलामगिरीतून मुक्त केले. त्यामुळे मोगल गुलामी मानसिकतेच्या प्रतिकांना उत्तरप्रदेशात स्थान नाही. म्हणूनच आम्ही आग्रा येथील संग्रहालयाला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचे नाव दिले आहे. या संग्रहालयाच्या माध्यमातून मराठा साम्राज्याचा इतिहास मांडला जाणार आहे; कारण मराठा साम्राज्याचा इतिहास केवळ राष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला प्रेरणादायी आहे.
महाराष्ट्रात कोणत्याही राजकीय पक्षाला महाराज यांच्या किर्तीला साजेसे स्मारक उभारता आले नाही ! – छत्रपती उदयनराजे भोसले
आतापर्यंत अनेक राजकीय पक्षांनी, तसेच पक्षांच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा उपयोग स्वत:च्या राजकीय लाभासाठी करून घेतला; मात्र योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या राजकीय नेत्याने प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे संग्रहालय बनवून त्यांच्या पराक्रमाचा यथोचित गौरव केला आहे. महाराजांचा खरा इतिहास जगापुढे आणण्याचा आपण प्रयत्न केला आहे. याविषयी आमच्या घराण्याच्या वतीने आम्ही तुमचे आभार मानतो. आजपावेतो महाराष्ट्रात कोणत्याही राजकीय पक्षाला महाराज यांच्या किर्तीला साजेसे स्मारक उभारता आलेले नाही; मात्र उत्तरप्रदेशामध्ये संग्रहालयाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे राष्ट्रीय स्मारक उभे राहिले असल्याचा अभिमान संपूर्ण देशाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या निर्माण कार्यासाठी प्रारंभी महाराजांच्या आग्रा येथून सुटकेच्या घटनेचा इतिहास शोधण्यासाठी पुरावे गोळा करण्यात आले. वर्ष २०१६ च्या जानेवारी मासात या संग्रहालयाचे भूमीपूजन झाले. ताजमहालच्या दरवाज्यापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर हे संग्रहालय उभे रहात आहे. अनुमाने २०० कोटी रुपये व्यय करून उभारण्यात येणार्या या संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराज यांचा संपूर्ण इतिहास मांडण्यात येणार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात