-
१ वीज प्रकल्प, तर २ पूल वाहून गेले
-
सैन्याकडून पूल बांधण्याचा प्रयत्न
भारतात आपत्काळाला प्रारंभ झाला आहे आणि तो प्रतिदिन हळूहळू त्याचे रौद्र रूप दाखवत आहे. जोशी मठातील हिमकडा अचानक कोसळून पूरसदृश्य स्थिती निर्माण होणे, हा याच आपत्काळातील प्रसंग आहे.
जोशी मठ (उत्तराखंड) : येथे सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हिमालयातील एक हिमकडा कोसळून आलेल्या पूरसदृश्य स्थितीमुळे येथील धौलीगंगा नदीवरील १ वीज प्रकल्प वाहून गेला आहे. तपोवन परिसरातील हायड्रो प्रकल्पावर काम करणारे १५० हून अधिक कामगार बेपत्ता झाले आहेत, तसेच पाण्याच्या तडाख्यात नदीवरील २ पूल वाहून गेले आहेत. सीमाभागातील मलारीला जोडणारा पूलही वाहून गेला आहे. हा पूल भारतीय सैन्याला सीमाभागांशी जोडतो. पूल वाहून गेल्यामुळे सैन्याने आयटीबीपीच्या २०० सैनिकांना जोशी मठात पाठवले आहे, तसेच दुसरे पथक घटनास्थळाकडे पाठवण्यात आले आहे. येथे पूल बनवणारे सैन्याचे पथकही पाठवण्यात आले आहे. या सर्व परिस्थितीवर गृहमंत्रालयाकडून लक्ष ठेवले जात आहे. नदीच्या या प्रवाहामुळे थेट गंगा नदी किनारी असलेल्या उत्तरप्रदेशातील कानपूर शहरापर्यंत सतर्कतेची चेतावणी देण्यात आली होती; मात्र याचा परिणाम चमोलीपर्यंतच जाणवला. या घटनेनंतर प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. बचावकार्य चालू आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी गेले होते. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे सैनिक साहाय्यकार्य करत असून अनेकांना धोकादायक ठिकाणावरून दुसरीकडे हलवण्यात आलेे आहे. या घटनेची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली असून त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना बचाव कार्यासाठी सूचना दिल्या आहेत. ते या स्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
१. चमोली जिल्ह्यातील रेणी येथील जोशी मठ परिसरात हा हिमकडा कोसळला. त्यामुळे पाण्याचा मोठा प्रवाह नदीतील धरणात आला. या प्रवाहामुळे धौलीगंगा नदीवरील ऋषी गंगा पॉवर प्रोजेक्टची मोठी हानी झाली. या धरणाची भिंत फुटल्याने धौलीगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. अचानक पूर आल्याने नदीकाठावरील घरांना याचा फटका बसला असून अनेक जण बेपत्ता झाले आहेत.
२. ऋषी गंगासमवेत अलकनंदा नदीकाठी रहाणार्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. अलकनंदा परिसरात अडकलेल्या नागरिकांनाही सुरक्षितपणे हलवण्यात आले आहे.
३. अलकनंदा नदीला पूर येऊ नये; म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून भगीरथी नदीचा प्रवाह बंद करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी दिली. रावत यांनीही घटनास्थळाकडे धाव घेतली आहे.
४. येथील धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या बोगद्यांमध्ये अडकेलेल्या १६ कर्मचार्यांना एन्.डी.आर्.एफ्.च्या सैनिकांनी सुटका केली. हिमनदीच्या सरोवराला पूर येणे म्हणजे काय? हिमकडा कोसळल्याने त्यामधील बर्फ, दगडमाती हे येथे असलेल्या हिमनदीच्या सरोवरामध्ये पडल्याने त्याला पूर येतो. त्यामुळे पाण्याच्या प्रचंड प्रवाहासमवेत मोठ्या प्रमाणावर हिमनग, दगडगोटे आणि माती वाहून येते. हिमकडा तुटणे आणि त्यामुळे हिमनदीच्या सरोवराला पूर येण्यामागे बर्फाची झीज होणे, हिमनदीतील पाण्याचा दबाव वाढत वाढणे, तसेच बर्फामध्ये भूकंप होणे अशी अनेक कारणे असतात. हिमनद्यांच्या सरोवरांचे प्रमाण वेगवेगळे असू शकते. ही सरोवरे कोट्यवधी घनमीटर पाणी साठवतात. बर्फ किंवा हिमनदीत गाळ नसल्यामुळे काही मिनिटे, घंटा किंवा काही दिवस या पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगाने बाहेर पडत असतो. तज्ञांच्या मते, हिमवृष्टीच्या सरोवराच्या उद्रेकाची थेट कारणे म्हणजे मुसळधार पाऊस, हिमवृष्टी, भूकंप, दीर्घावधी धरणाचे विसर्ग (धरणातून पाणी सोडणे) आणि तलावामध्ये जलद उतार ही असतात.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात