मारेकरी पसार
यातील दोषींना सरकारने शोधून काढून तात्काळ फासावर लटकवले पाहिजे, अशी जनतेची मागणी आहे !
ठाणे : भारतीय नौदलात कार्यरत असलेले सुरजकुमार मिथिलेश दुबे (वय २७ वर्षे) यांचे १० लाख रुपयांच्या खंडणीसाठी ३१ जानेवारी या दिवशी चेन्नई विमानतळावर ३ अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले होते.
त्यांना ३ दिवस चेन्नई येथे अज्ञातस्थळी कोंडून ठेवून त्यांच्याकडे १० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. त्यांनी ती देण्यास नकार दिल्यानंतर त्यांना चारचाकी गाडीमधून ५ फेब्रुवारीला महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या सीमेलगतच्या तलासरी तालुक्यातील वेवजी गावच्या पश्चिम घाटातील जंगलात आणण्यात आले. तेथे सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पिस्तुलीचा धाक दाखवून तिघांनी त्यांच्या शरीरावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले.
या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिल्यानंतर घोलवड पोलिसांनी दुबे यांना आगर उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. त्यानंतर अधिक उपचारांसाठी त्यांना मुंबई येथील रुग्णालयात हालवले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी ३ अज्ञात अपहरणकर्त्यांविरुद्ध घोलवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील अन्वेषण चालू आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात