Menu Close

अन्सारी आणि असुरक्षितता !

भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचे नूतन पुस्तक ‘बाय मेनी अ हॅपी अ‍ॅक्सिडेंट : रिकलेक्शन ऑफ लाईफ’ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहे. एक प्रशासकीय अधिकारी म्हणून विविध देशांत भारताचे राजदूत राहिलेल्या, अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालयाचे ‘उपकुलपती’चे पद भूषवलेल्या, राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळलेल्या आणि २ वेळा म्हणजे तब्बल १० वर्षे या सार्वभौम राष्ट्राच्या उपराष्ट्रपतीपदी विराजलेल्या या व्यक्तीने स्वत:च्या सामाजिक जीवनात घडलेल्या काही प्रसंगांना या पुस्तकाद्वारे वाचा फोडली आहे. देशातील सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा मागोवा घेण्याचा या पुस्तकातून अन्सारी यांनी त्यांच्या परीने म्हणा कि पद्धतीने म्हणा, एक प्रयत्न केला आहे. या पुस्तकातील काही उतार्‍यांवरून, तसेच सध्या त्यावरून अनेक प्रथितयश संपादक नि पत्रकार हे घेत असलेल्या अन्सारी यांच्या मुलाखतींतील वक्तव्यांच्या अनुषंगाने सध्या रणकंदन माजले आहे. त्याची कारणेही तशी स्वाभाविक आहेतच !

भारतीय मुसलमान ‘खतरें में’ ?

वर्ष २०१७ मध्ये उपराष्ट्रपतीपदावरून निवृत्त झालेले अन्सारी या पुस्तकात लिहितात, ‘देशातील मुसलमान असुरक्षित जीवन जगत आहेत.’ एका उत्तरदायी व्यक्तीने असे संवेदनशील वक्तव्य करतांना त्यास नेमकी कारणमीमांसा नि तार्किक आधार देणे अत्यंत आवश्यक असते; परंतु अन्सारी यांनी मात्र त्याचे काहीच स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यांच्या या सूचक वक्तव्यावर बोट ठेवत एका पत्रकाराने त्यांच्या घेतलेल्या एका मुलाखतीत त्यांना ‘हिंदूही असुरक्षित जीवन जगत आहेत, असे तुम्हाला वाटत नाही का ? ‘मॉब लिंचिंग’ केवळ मुसलमानांचे नाही, तर हिंदूंचेही होते. या हत्या धर्म पाहून होतात का ?’, अशा प्रकारे थेट प्रश्‍न केल्यावर अन्सारी महाशय मुलाखत सोडून उठून गेले. अर्थात् अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालयात महंमद अली जिना यांचे अनेक वर्षांपासून लावलेले तैलचित्र काढल्यावरून त्यास विरोध करणारे आणि एकीकडे दादरीतील ‘अकलाख’ हत्याकांडावरून आकाशपाताळ एक करणारे; परंतु गोरक्षक ‘प्रशांत पुजारी’ याच्या निर्घृण हत्येवर मूग गिळून गप्प बसणारे तत्कालीन माननीय उपराष्ट्रपती यांच्या मुलाखतीतून उठून जाण्याच्या कृतीवर कुणाला आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही.

भारतीय मुसलमानास बहुमान !

अन्सारी म्हणतात की, आपण मुसलमान आहोत, हे आतापर्यंत महत्त्वाचे राहिलेले नसून आपल्यातील व्यावसायिक योग्यता ही महत्त्वाची राहिली आहे. मी या देशाचा नागरिक आहे कि नाही ? जर नागरिक असेन, तर नागरिकत्वामुळे मिळणारे सर्व अधिकार मला मिळायला हवेत. अन्सारी यांचे वक्तव्य सत्य आहे आणि त्यामुळेच त्यांना या ‘देशाचे दुसरे नागरिक’ होण्याचा बहुमान १० वर्षे लाभला. त्यामुळेच एक मुसलमान नेते देशातील सर्वांत विकसित राज्याचे मुख्यमंत्री राहिले, एका प्रतिभावंत मुसलमान वैज्ञानिकाला ‘भारताचा मिसाईलमॅन’ नावाने गौरवण्यात आले, एवढेच नव्हे, तर त्याला या देशाचा राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळाला आणि सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यास सन्मानितही करण्यात आले. तसेच सीएए कायद्याला विरोध करून मुसलमान नागरिकांची दिशाभूल करणार्‍यांना हे करण्याचे स्वातंत्र्यही ते या देशाचे अविभाज्य घटक अर्थात् नागरिक असल्यामुळेच मिळाला, हे तरी विसरून कसे चालेल ? दुसरीकडे जम्मू-काश्मीरचा मुख्यमंत्री हा एखादा हिंदु होऊ शकतो, असे स्वप्नतरी कुणी पाहील का ? असो.

गंगा जमुनी तहजीब !

याच काश्मीरला विशेषाधिकार प्रदान करणार्‍या कलम ३७० ला रहित करण्याच्या पद्धतीला अन्सारीजी यांनी आक्षेप नोंदवला आहे, तसेच ३७० कलम रहित करणे योग्य होते कि अयोग्य, यावर मात्र महाशय काही बोलण्यास उत्सुक नाहीत, असे त्यांच्या एका मुलाखतीतून दिसून येते. देशाचे अखंडत्व राखण्यासाठीच्या ऐतिहासिक प्रयत्नावर मौन बाळगणे, हे धोक्याचे आहेच; परंतु त्यासाठीच्या पद्धतीवर बोट ठेवणे, हे त्याहूनही अधिक भयावह आहे, हे विसरता कामा नये. देशाच्या ७५ लाखांहून अधिक नागरिकांना मागास ठेवणार्‍या, सहस्रावधी सैनिक आणि निष्पाप नागरिकांचे बलीदान सहन करणार्‍या परिस्थितीवर हे कलम रहित करणे, हा एकमेव जालीम उपाय होता. त्यावर रुसणारे उपराष्ट्रपती हे ३ दशकांआधी काश्मीर खोर्‍यातील ७ लक्ष काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अनन्वित अत्याचारांच्या नि हिंदूंच्या वंशविच्छेदाच्या विरोधात मात्र एक शब्दही बोलत नाहीत. आजही हे सर्व हिंदू देशातील विविध भागांत हलाखीचे जीवन कंठित आहेत. बहुसंख्यांक समाज असुरक्षित जीवन जगत आहे, यावर माजी उपराष्ट्रपती का बोलत नाहीत ? ‘आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचे ते कार्टे’ असण्याचा हा प्रकार नव्हे काय ? त्यामुळेच ‘गंगा जमुनी तहजीब’ (गंगा आणि जमुना यांच्या तिरावर वास्तव्य करणार्‍या हिंदू अन् मुसलमान यांच्यातील कथित ऐक्य.) अंगीकारणे हे केवळ हिंदूंनाच बंधनकारक करणार्‍यांच्या मानसिकतेपासून आज देशाने खरेतर सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे. ज्या राष्ट्राच्या संस्कृतीवर १ सहस्र वर्षे आघात करूनही त्या संस्कृतीने अल्पसंख्यांकांना स्वीकारले, त्यांना बहुमान दिला, त्या बहुसंख्यांकांवर आगपाखड करण्याचा या महाशयांना नैसर्गिक अधिकार तरी आहे का ? आज ‘ग्रेटा’ आणि ‘रिहाना’ यांच्या काळात जिथे सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीला काळीमा फासू पहाणार्‍या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राला नेस्तनाबूत करण्यास सज्ज झाले पाहिजे, तिथे अशी वक्तव्ये करणे अन् राष्ट्रघातकी ‘मौन’ बाळगणे, हे त्या षड्यंत्ररूपी तेलात आग ओतण्याचे काम करत नाही का ? आणि हो, त्यामुळेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली केंद्रशासनाने कलम ३७० रहित करण्यास जे शौर्य आणि नीती अवलंबली होती, ती १०० टक्के राष्ट्रहिताला धरूनच होती, हे सांगण्याची वेळ आली आहे.

अन्सारी यांची वक्तव्ये हा वैचारिक आतंकवादाचा प्रकार आहे, जो जिहादी आतंकवादापेक्षाही भयंकर आहे. हे लक्षात घेऊन त्यांच्या वक्तव्यांचा सर्वच व्यासपिठांवरून वैचारिक प्रतिवाद करणे आवश्यक आहे. यासाठी धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी आणि त्याहून अधिक सरकारने कठोर प्रयत्न करणे आवश्यक !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *