१४ फेब्रुवारी हा दिवस ‘मातृ-पितृ पूजनदिन’ म्हणून साजरा करण्यात यावा !
हिंदु जनजागृती समितीची निवेदनाद्वारे मागणी
सातारा : गत काही वर्षांत १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्चात्त्यांची कुप्रथा रूढ झाली आहे. त्यामुळे १४ फेब्रुवारी हा दिवस शाळा-महाविद्यालयांत ‘मातृ-पितृ पूजनदिन’ म्हणून साजरा करण्यास प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
वडूज (जिल्हा सातारा) येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात प्रा. डॉ. क्षितीज धुमाळ यांना, छत्रपती शिवाजी विद्यालयात मुख्याध्यापक ज्ञानेश्वर जाधव यांना आणि वडून पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार वाघमारे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री हंसराज पटेल, रमेश गोडसे, विनायक ठिगळे, जनार्दन फडतरे आदी उपस्थित होते.
निवेदनामध्ये म्हटले आहे की,
१. प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या विकृत संकल्पनेमुळे भारतीय युवा पिढी भोगवाद आणि अनैतिकता यांच्या गर्तेत ओढली जात आहे. यामुळे समाजात एकतर्फी प्रेमातून मुलींची छेड काढणे आणि हिंसक घटना घडल्या आहेत.
२. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली युवक-युवती यांच्यात मेजवाण्या, मद्यपान, धूम्रपान, अमली पदार्थांचे सेवन आदी प्रकारांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
३. या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी काही समाजसेवी संघटना गत काही वर्षांपासून ‘मातृ-पितृ पूजनदिना’च्या माध्यमातून युवा पिढीसमोर एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन आपापल्या माता-पित्यांचे पूजन करणे आणि त्यांच्याविषयी प्रेमयुक्त कृतज्ञता व्यक्त करणे, असे उपक्रमाचे स्वरूप असते.
४. असे उपक्रम शाळा आणि महाविद्यालय स्तरावर घेण्यात मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांनी पुढाकार घ्यावा.
‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखा ! – हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा प्रशासनास निवेदन
बेळगाव : ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर प्रेमाचे बीभत्स सादरीकरण करण्याच्या नावाखाली हल्ली एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्ये घडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तरी या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी शासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या वतीने शिरस्तेदार नदाफ यांनी स्वीकारले. या वेळी धर्मप्रेमी श्री. सदानंद मासेकर, सौ. अक्काताई सुतार, सौ. मिलन पवार, सामाजिक कार्यकर्त्या सौ. माधुरी जाधव, कु. निकिता सोमनाचे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुधीर हेरेकर आणि श्री. हृषिकेश गुर्जर उपस्थित होते.
‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पोलिसांची विशेष पथके नियुक्त करा ! – हिंदु जनजागृती समितीचे उपविभागीय पोलीस अधिकार्यांना निवेदन
गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) : ‘व्हॅलेंटाईन डे’मुळे शाळा-महाविद्यालयाच्या परिसरातील कायदा-सुव्यवस्था, तसेच शैक्षणिक वातावरण बिघडवणारी स्वैराचारी आणि चंगळवादी वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. तरी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणार्या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांची विशेष पथके नियुक्त करावीत, शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात अपप्रकार करणार्या समाजकंटकांना कह्यात घ्यावे, महाविद्यालय परिसरात पहारा वाढवावा यांसह अन्य मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ११ फेब्रुवारी या दिवशी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांना निवेदन देण्यात आले.
‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पंचायत समिती येथे शिक्षण विस्तार अधिकारी रमेश कोरवी यांना, तसेच नायब तहसीलदार जीवन क्षीरसागर यांनाही निवेदन देण्यात आले. याप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री वामन बिलावर, प्रदीप वेरणेकर आणि दत्ताराम विठोबा पाटील उपस्थित होते.
प्रबोधनाची आवश्यकता !
शालेय स्तरांवर ‘व्हॅलेंटाईन डे’सारखे दिवस साजरे होत नसले, तरी प्राथमिक-माध्यमिक वर्गातील विद्यार्थीच पुढे युवक बनून महाविद्यालयांत जात असल्याने असे दिवस साजरे न होण्यासाठी त्यांचेही प्रबोधन होणे आवश्यक आहे.