Menu Close

उत्तराखंडमध्ये ५८ धरणे प्रस्तावित; मात्र अमेरिकेमध्ये फोडली जात आहेत धरणे !

१ सहस्र ७०० धरणे फोडली !

एरव्ही पाश्‍चात्त्यांचे अनुकरण करणारा भारत याविषयी मात्र उलट कृती का करत आहे ? 

देहरादून (उत्तराखंड) – उत्तराखंडच्या जोशी मठ येथे हिमकडा कोसळून आलेल्या प्रलयामुळे अनेक जण बेपत्ता झाले आहेत. एका आठवड्यानंतरही त्यांचा शोध लागलेला नाही. या प्रलयामध्ये २ जलविद्युत प्रकल्प वाहून गेले असले, तरी येथे अजून ५८ प्रकल्प प्रस्तावित असल्याची माहिती समोर आली आहे.

दुसरीकडे विकसित देश धरणांचा विरोध करू लागले आहेत. अमेरिका यात सर्वांत आघाडीवर आहे. धरण बांधणार्‍या आस्थापनानुसार जलविद्युत निर्मितीत कमाईपेक्षा निगराणीवरच अधिक खर्च होतो. कॅलिफोर्नियात ८ मोठ्या धरणांपैकी ४ धरणे फोडण्याचा करार झाला. अमेरिकेमध्ये वर्ष १९७६ पासून धरणे फोडली जात असून आतापर्यत १ सहस्र ७०० धरणे फोडण्यात आली आहेत. यांतील १ सहस्र धरणे गेल्या १४ वर्षांत फोडण्यात आली आहेत. यांतील ९० धरणे तर निष्क्रीयच होती. आता अमेरिकेत नवीन धरणे बांधली जात नाहीत. वर्ष २००४ मध्ये कोलोराडोमधील एका धरणाच्या अभ्यासात नमूद करण्यात आले की, या प्रकल्पात पाण्याची कमतरता ८ टक्क्यांवरून ४१ टक्के झाली आणि सरकारी खर्च वाढला.

धरणे बांधण्यात भारत जगात ३ र्‍या क्रमांकावर !

१ कोटी हेक्टर सुपीक भूमी पाण्यात !

जगभरात धरणे बांधण्यात भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे. भारतात लहान मोठी ३ सहस्र ६०० धरणे आहेत. यांची उंची ३३ मीटरपर्यंत आहे. यांतील ३ सहस्र ३०० धरणे स्वातंत्र्यानंतर बांधण्यात आली आहेत. यातील २.२ टक्के प्रकल्पात जलविद्युत निर्मिती होते. ३.५ टक्के धरणे सिंचन, वीजनिर्मिती आणि जलपुरवठा करू शकतात. या धरणांमुळे १ कोटी हेक्टर सुपीक भूमी पाण्यात गेली आहे. तसेच ५ लाख हेक्टर वनक्षेत्राची हानी झाली आहे. याखेरीज ४ कोटी लोक बेघर झाल्याने विस्थापित झाले आहेत.

उत्तरखंडमध्ये ५०० हून योजनांचे जाळे !

१. उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पांसाठी बांधल्या जात असलेल्या बोगद्यांची लांबी सुमारे १ सहस्र ५०० कि.मी आहे. बोगद्यामधून हे पाणी वळवणे हा अशा प्रकल्पांचा उद्देश आहे. यात २८ लाख लोकसंख्येवर याचा परिणाम होणार आहे. राज्यांत सुमारे ५०० हून अधिक अशा योजनांचे जाळे असल्याचे दिसून येते. यात काही प्रकल्प पूर्ण आहेत, तर काहींचे काम चालू आहे. काही चालू होण्यापूर्वीच बंद पडले आहेत, असे वृत्त दैनिक ‘भास्कर’ने दिले आहे.

२. उत्तर काशीमध्ये ८.५ किमी अंतरावर भागीरथी नदीवर अशाच धरणाचे बांधकाम चालू आहे. ऑक्टोबर २००९ मध्ये राष्ट्रीय गंगा प्राधिकरणाच्या साहाय्याने येथील ४ जलविद्युत प्रकल्पांना स्थगिती दिली होती; मात्र अधूनमधून येथे काम चालू राहिले.

३. उत्तराखंड राज्य फलोत्पादन आणि वन विद्यापिठाचे पर्यावरण विभागाचे प्रा. डॉ. एस्.पी. सती यांनी सांगितले की, चमोलीमध्ये आलेली आपत्ती नैसर्गिक मानली, तरी जलविद्युत प्रकल्पांनी ती आता मानवनिर्मिती आपत्ती ठरली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *