जळगाव : ‘व्हॅलेंटाईन डे’ ही पाश्चात्य कुप्रथा बंद करण्याच्या मागणीसाठी हिंदूराष्ट्र सेनेच्या वतीने जळगाव शहरात धडक मोहीम राबवण्यात आली. सामाजिक प्रसारमाध्यमाद्वारे युवक-युवती आणि उपाहारगृह चालक यांचे प्रबोधन करण्यात आले. तसेच या वेळी काही अल्पवयीन युगुलांना पालकांच्या, तर दोन युगुलांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
१४ फेब्रुवारीला ६० हून अधिक दुचाकी, १५० हून अधिक धर्मप्रेमी यांनी रॅली काढून उद्बोधन केले. याचा चांगला परिणाम दिसला. असंख्य ठिकाणी प्रेमीयुगल आढळले नाहीत. काही उपाहारगृह चालकांनी सावधानता बाळगून विशेष नियोजन केले नव्हते आणि ज्यांनी केले होते त्यांनी ते रहित केले. आंदोलनाच्या प्रभावामुळे प्रेमीयुगलांचे वर्दळीचे ठिकाण असलेल्या मेहरूण तलाव येथे शांतता आढळली. सायंकाळी शहरातील वृद्धाश्रमात जाऊन तेथील वृद्ध माता-पित्यांचे पुष्पहार, कुमकुमतिलक लावून पूजन करण्यात आले. या वेळी क्रांतिवीरांचे स्मरणही करण्यात आले. ‘भारतीय संस्कृती का अपमान, नही सहेगा हिंदुस्थान’, ‘भगतसिंह-राजगुरु-सुखदेव अमर रहे’, ‘अश्लीलताका का प्रचार नही चलेगा’, ‘वन्दे मातरम् !’, ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’ आदी घोषणांनी शहर दणाणून गेले होते.
क्षणचित्रे
१. मोहीम शांततेत पार पडली.
२. यशस्वीतेसाठी मोहीम सकाळी आणि सायंकाळी राबवण्यात आली.
३. शेवटी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात