भारत आणि अमेरिका यांच्यासाठी धोका !
चीन इस्रायलसारख्या राष्ट्रहितासाठी दक्ष असणार्या देशातील अभियंत्याकडून असे तंत्रज्ञान विकत घेऊ शकतो, यावरून तो किती धूर्त आहे, हे लक्षात येते. चीन अधिकाधिक धोकादायक होत असतांना त्याचा सामना करण्यासाठी भारताने त्याच्याशी दोन हात करण्यासाठी सर्वच प्रकारे सिद्ध रहाणे आवश्यक !
जेरुसलेम (इस्रायल) – इस्रायलने त्याच्या २० अभियंत्यांच्या विरोधात एका आशियाई देशाला ‘हारोप’ या घातक ड्रोनचे तंत्रज्ञान विकल्याचा आरोप केला आहे. इस्रायलने या देशाचे नाव सांगितले नसले, तरी तज्ञांनुसार हा देश चीन आहे. याआधी इस्रायल चीनला देखरेख ठेवण्यासाठी हे ड्रोन देणार होता; मात्र अमेरिकेने हा व्यवहार थांबवला. स्वतःच्या शस्त्रविक्री व्यवसायावर परिणाम होऊ नये, यासाठी इस्रायलने या देशाचे नाव उघड केले नाही, असे म्हटले जात आहे. हे वृत्त समोर येण्याआधी ३ देशांना हे घातक ड्रोन क्षेपणास्त्र देण्याचा करार करणार असल्याचे इस्रायलने घोषित केले होते. यात भारताचा समावेश आहे. इस्रायलचे वृत्तपत्र ‘येरूसलेम पोस्ट’नुसार भारताने वर्ष २०१९ मध्ये इस्रायलकडून १५ हारोप ड्रोन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
जर हे तंत्रज्ञान चीनच्या हाती गेल्यास भारत आणि अमेरिका यांच्यासाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो. हे तंत्रज्ञान इराण आणि उत्तर कोरिया यांच्याकडे जाऊ नये, अशी भीती इस्रायलला वाटत आहे.
हारोप ड्रोन आहे काय ?
गेल्या वर्षी अजरबैझान आणि आर्मेनिया यांच्यात झालेल्या युद्धात अजरबैझानने हारोप ड्रोनचा वापर केला होता. या ड्रोनच्या मार्यासमोर आर्मेनियाचा एअर डिफेन्स सिस्टम आणि टँक निष्प्रभ ठरले. अजरबैझानच्या सैन्याला आघाडी मिळवून देण्यास हारोपचा मोठा वाटा राहिला. या ड्रोनमध्ये असलेली अॅण्टी रडार होमिंग सिस्टम शत्रूच्या रडारलादेखील अटकाव करू शकते. या ड्रोनला लक्ष्य न सापडल्यास पुन्हा आपल्या तळावर दाखल होतो. लक्ष्य आढळून आल्यास हा ड्रोन त्याला धडक देऊन पुन्हा स्वत:ला उडवून घेतो.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात