मशिदी आणि मदरसे यांवर नियंत्रण ठेवण्यात येणार
फ्रान्सने हाताच्या बोटावर मोजण्यात येणार्या जिहादी आक्रमणानंतर कायदा करण्याचा प्रयत्न केला आहे; मात्र भारतात स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांपासून धर्मांधांकडून प्रतिदिन हिंदूंवर आक्रमण होत असतांना भारत मात्र ढोंगी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी निष्क्रीयच राहिला आहे !
पॅरिस (फ्रान्स) – फ्रान्सच्या संसदेत इस्लामी कट्टरतावादावर नियंत्रण ठेवण्यासाठी मांडण्यात आलेले ‘पॅटी’ विधेयक संमत करण्यात आले. यात बलपूर्वक विवाह, बहुविवाह, तसेच मशिदी आणि मदरसे यांवर लक्ष ठेवण्यात येण्याची तरतूद आहे. फ्रान्समध्ये गेल्या काही वर्षांत धर्मांधांकडून केल्या जात असलेल्या हिंसाचारामुळे देशात असे कायदे करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
काही मासांपूर्वी ‘शार्ली हेब्दो’ नियतकालिकामधील महंमद पैगंबर यांचे व्यंगचित्र वर्गात दाखवण्यावरून पॅटी सॅम्युअल नावाच्या शिक्षकाची धर्मांधाकडून गळा चिरून हत्या करण्यात आली होती. त्या सॅम्युअल पॅटी यांच्या नावाने हा कायदा करण्यात आला आहे.
१. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रों म्हणाले की, धर्मनिरपेक्षता आणि समानता या मूल्यांचे रक्षण होणे आवश्यक आहे. त्यासाठी अशा कायद्यांची आवश्यकता आहे. (फ्रान्स धर्मनिरपेक्षतेचे पालन होण्यासाठी कायदा करत आहे, हे भारताने आणि भारतातील तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांनी लक्षात घ्यावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. फ्रान्समधील मुसलमानांचे म्हणणे आहे की, हा कायदा मुसलमानांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर नियंत्रण आणू शकतो, तसेच याद्वारे मुसलमानांना लक्ष्य केले जाऊ शकते. देशात आतंकवादी कारवायांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या कायदे आहेत. त्यामुळे नवीन कायद्यांची आवश्यकता नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात