Menu Close

अरुणाचल प्रदेशात चीनचे गाव : किती खरे आणि किती खोटे ?

१. चीनने भारतीय प्रदेशात गाव वसवल्याचे वृत्त अतिरंजित !

एका वृत्तवाहिनीने बातमी दिली होती की, चीनने अरुणाचल प्रदेशमध्ये साडेचार किलोमीटर आत एक गाव निर्माण केले आहे. पुरावे म्हणून वाहिनीने काही उपग्रहांद्वारे काढलेली छायाचित्रेही दिली होती. शत्रूला जर अतिक्रमण करायचे असेल, तर तेथे कुणीही खेडे किंवा गाव सिद्ध करत नाही. त्या ठिकाणी सैन्य, रणगाडे, तोफा, हेलिकॉप्टर्स, ड्रोन्स आदी शस्त्रे आणली जातात. लढण्यासाठी एका राष्ट्राने दुसर्‍या राष्ट्राच्या प्रदेशात गावे वसवली, हे कुणालाच पटणार नाही. तेथील निःशस्त्र नागरिकांवर भारत आक्रमण करू शकतो का ? त्यामुळे अशी अतिरंजित गोेष्ट खोटी असते. एखाद्या देशाला अतिक्रमण करायचे असेल, तर तो सैन्याला आत आणेल, नागरिकांना आत आणणार नाही. या वृत्तवाहिनीच्या बातमीनंतर लगेच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली की, देशाचे रक्षण करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. आम्ही देशहिताकडे लक्ष देऊ. थोडक्यात परराष्ट्र मंत्रालयानुसार असे काही घडलेलेच नाही.

चीनने ५ मे २०२० पासून लडाखमध्ये संघर्ष उभा केला आहे; पण यातून चीनला काहीच प्राप्त झाले नाही. त्यामुळे आता चीन विविध अयोग्य मार्गांचा अवलंब करत आहे. चीनचे काही हस्तक भारतीय माध्यमांमध्ये आहेत. ते मागील ८ ते ९ मासांपासून अपप्रचार करण्याचा प्रयत्न करत असतात. आता लडाखमध्ये बर्फ पडत आहे. त्यामुळे एप्रिलपर्यंत चीनने काही करायचे ठरवले, तरी तो काही करू शकत नाही.

२. गावे वसवण्यामागील चीनची रणनीती

अ. शत्रूूराष्ट्राच्या हद्दीत अतिक्रमण करण्यासाठी कुणीही गाव वसवत नाही. त्यामुळे यामागील पार्श्‍वभूमी लक्षात घ्यावी लागेल. चीनने सीमावर्ती भागात ५०० ते ६०० गावे वसवण्याची रणनीती आखली होती. त्यासाठी पुष्कळ धन व्यय करण्याचीही त्यांची सिद्धता होती. त्यांना ही गावे चीनच्या महामार्गांशी जोडायची होती. यात काही गावे सिद्धही झाली आहेत; परंतु ती सर्व चिनी प्रदेशात असून तेथे कुणीही रहात नाहीत. तेथे रहाण्यासाठी त्यांना कुणी बळजोरीने पाठवत असेल, तर निराळी गोष्ट आहे; पण कोणताही सामान्य नागरिक अशा कठीण प्रदेशात राहू इच्छिणार नाही.

आ. असे असतांनाही चीन ही गावे वसवत आहे. यातून चीनला भारताच्या सीमावर्ती भागात रहाणार्‍या नागरिकांना संदेश द्यायचा आहे की, आम्ही सीमा प्रदेशाला किती विकसित केले आहे ! या गावांमध्ये चीनला चिनी हन आणि चिनी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य असलेले तिबेटी नागरिक यांना वसवायचे होते; परंतु कोणताही चिनी किंवा तिबेटी नागरिक या सीमा प्रदेशात यायला सिद्ध नाही. हा पर्वतीय भाग असल्याने तेथे जगण्यासाठी करण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे तेथे स्थायिक होणे अतिशय कठीण आहे.

इ. चीनने तिबेटवर नियंत्रण ठेवले आहे; परंतु भारत-चीन सीमेमधून भारत गुप्तहेर किंवा एस्.एस्.एफ्.चे लोक यांना चीनमध्ये पाठवत असतील, तर त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ही गावे सीमा क्षेत्रात होणार होती. जर तिबेटी नागरिक तिबेटमधून सीमेपलीकडील अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, हिमाचल प्रदेश किंवा उत्तराखंड आदी राज्यांमध्ये प्रवेश करत असतील, तर त्यांच्यावरही लक्ष ठेवता यावे, हाही ही गावे वसवण्यामागे चीनचा उद्देश होता.

३. चीनने गाव वसवल्याविषयीची ब्रेकिंग न्यूजच हास्यास्पद !

सुबनसिरी जिल्ह्यात हे गाव अचानक सिद्ध झाले नाही. दूरचित्रवाहिनीवर दाखवण्यात येणार्‍या वृत्तामध्ये ब्रेकिंग न्यूज अशी यात काहीही नाही. गाव सिद्ध व्हायला किमान १ ते ८ वर्षे लागतात. आज भारतीय सैन्याची एवढी क्षमता आहे की, उपग्रह किंवा तत्सम आधुनिक तंत्रज्ञानामुळे कुठे काय चालू आहे, याची त्यांना सर्व माहिती असते. ते दूरचित्रवाहिनीने सांगण्याची आवश्यकता नाही. अशी कोणतीही गोष्ट नाही की, जी एखाद्या वृत्तवाहिनीला ठाऊक असेल; पण भारतीय सैन्याला त्याविषयी काही माहिती नसेल. संबंधित वृत्तवाहिनीला आपण पुष्कळ मोठे काम केले आहे, असे वाटत असेल; पण ते सर्व हास्यास्पद आहे.

४. चीनने वादग्रस्त भागात गाव वसवणे

अरुणाचल प्रदेशातील सुबनसिरी जिल्ह्यातील लोग्जू हे ठिकाण नेहमीच वादग्रस्त राहिले आहे. भारत म्हणतो की, तो प्रदेश आमचा आहे. चीन म्हणतो की, तो प्रदेश आमचा आहे. वर्ष १९५९ मध्ये तेथे भारताची चौकी होती. वर्ष १९६२ च्या युद्धापूर्वी चीनने आक्रमण करत ती बळकावली. वर्ष १९५९ पासून हा भाग चीनच्या कह्यात आहे. चीन म्हणतो की, लोग्जूच्या पुढेही आमचाच भाग आहे. अर्थात्च ते भारताला मान्य नाही. त्यामुळे चीनने गाव वसवल्याचा प्रकार हा वादग्रस्त क्षेत्रात केला आहे. त्यामुळे हे गाव भारतीय प्रदेशात आले आहे, असे म्हणणे चुकीचे आहे.

५. भारताच्या क्षेत्रात चीनने गाव वसवणे, ही सोपी गोष्ट नव्हे !

भारत-चीन सीमा ही अनुमाने ४ सहस्र किलोमीटर आहे. भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवर जसे भारतीय सैन्य तैनात आहे, तसे या ठिकाणी नाही. लडाखमध्ये संघर्ष उद्भवल्यानंतर या भागात सैन्य सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आत येऊन अतिक्रमण करणे चीनसाठी सोपी गोष्ट नाही. या प्रदेशावर भारतीय सैन्याचे उपग्रहाद्वारे लक्ष आहे. ड्रोन आणि हेलिकॉप्टर यांच्या साहाय्यानेही लक्ष ठेवले जाते. त्यामुळे भारताच्या हद्दीत गाव वसवणे सोपे नाही; मात्र पुढे असे होणारच नाही, असेही नाही. सुबनसिरी जिल्ह्यातील लोग्जू येथे हे झाले आहे. ते उपग्रहांच्या माध्यमातून लक्षात आले; पण ही गोष्ट विशेष नाही; कारण भारतीय सैन्याला ती आधीपासूनच ठाऊक आहे.

६. भारताशी लढू शकत नसल्याने चीनकडून खोट्या बातम्या पसरवण्याचे कारस्थान !

कोणत्याही देशाला दुसर्‍या देशात अतिक्रमण करायचे असेल, तर तेथे तो गाव वसवेल का ? त्याच्या सैन्यासाठी बंकर खोदेल किंवा लढण्यासाठी साहित्य जमवेल. कोणताही देश त्याच्या नागरिकांना पुढे करणार नाही. जर नागरिक तेथे राहू लागले, तर उद्या चीन त्या भागावर त्याचा हक्क सांगू शकतो. आमचे नागरिक एवढ्या वर्षांपासून येथे रहात आहेत. त्यामुळे हा संपूर्ण भाग आमचा आहे, असे चीन म्हणू शकतो; पण लढाई करण्यासाठी चीनला अशा प्रकारच्या संधींची आवश्यकता नाही.

आज चीन भारताशी लढण्याच्या स्थितीतच नाही, ही सत्यस्थिती आहे. चीनला स्वतःचे रक्त सांडवायचे नाही. येत्या एप्रिल २०२१ पर्यंत त्याला काही करता येणार नाही. त्यामुळे तो केवळ अशा प्रकारच्या बातम्या पसरवण्याचे काम करत राहील; पण देशवासियांनी कोणतेही संतुलन ढळू देऊ नये. त्यांनी भारतीय सैन्यावर विश्‍वास ठेवावा. अशा प्रकारे अन्य क्षेत्रांत चिनी घुसखोरी होऊ शकते. दुर्दैवाने पूर्वीच्या सरकारने चीनसमवेत काही आंतरराष्ट्रीय करार केले आहेत. त्यामुळे या ठिकाणी अतिक्रमण झाल्यास भारत ते निपटण्यासाठी सैनिकी कारवाई करू शकत नाही; कारण या करारांमुळे भारतीय सैन्याचे हात बांधले गेले आहेत.

जरी चीनने खरोखर अतिक्रमण केलेच, तर निश्‍चितपणे आपल्याला ते दूर करावेच लागेल. त्यासाठी भारतीय सैन्याचा उपयोग करणे, हा चांगला पर्याय आहे. चीनला चर्चेची भाषा समजत नाही. त्याच्याशी डिल करण्यासाठी केवळ सैन्याचाच उपयोग करावा लागेल. सैन्याचा उपयोग करण्यापूर्वी भारताकडे चीनची काही मर्मस्थाने आहेत. त्यांचा आधी वापर होणे आवश्यक आहे. चीनवर आर्थिक बहिष्कार घातला पाहिजे. अजूनही काही भारतीय कॉर्पोरेट सेक्टरमधील लोक चीनशी व्यावसायिक संबंध ठेवतात. त्यांवरही बंदी घातली पाहिजे.

७. भारताने चीनच्या गावांकडे संधी म्हणून पहायला हवे !

चीन जर भारत-चीन सीमेवर तिबेटी नागरिकांना वसवत असेल, तर भारताने त्याकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे. वसलेले बहुतांश नागरिक हे तिबेटी आहेत. त्यांना चीनपेक्षा दलाई लामा आणि भारत यांच्याविषयी विशेष आपुलकी आहे. त्यामुळे भारताने या संकटाचे रूपांतर संधीत केले पाहिजे. या गावांचा वापर चीनच्या विरोधात हेरगिरीसाठी करून घेऊ शकतो का ? हे पहावे.

८. भारत-चीन संघर्षामध्ये विरोधी पक्षांनीही सैन्याच्या मागे ठामपणे उभे रहाणे आवश्यक !

चीनच्या कोणत्याही कारवाईला प्रत्युतर देण्यासाठी भारत सर्व प्रकारे सिद्ध आहे. तरीही भारताने अधिकाधिक सिद्धता करायला पाहिजे; कारण चीनसमवेतची लढाई अनेक वर्षे चालणारी आहे. ही लढण्यासाठी भारतीय सैन्य सिद्ध आहेच; परंतु देशातील अन्य राजकीय पक्षांनीही सशस्त्र सैनिकांच्या मागे ठामपणे उभे रहायला पाहिजे. जे पक्ष किंवा एन्.जी.ओ. चीनची भाषा बोलतात, त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकायला हवा. सध्या विशेष असे काही झालेले नाही; परंतु पुढे काही होणार नाही, याची आपण निश्‍चिती देऊ शकत नाही. त्यामुळे भारताने नेहमी सिद्ध राहिले पाहिजे.

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *