साधू- संतांना आखाड्यांच्या छावण्या, तसेच त्यांचे आश्रम यांचा रहाण्यासाठी वापर करावा लागणार !
हरिद्वार (उत्तराखंड) : येथे १ एप्रिलपासून प्रारंभ होणार्या कुंभमेळ्यासाठी येणार्या साधू आणि संत यांच्यासाठी नदी किनारी शिबिर उभारण्यात येणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सरकार आणि प्रशासन यांनी कोरोनाच्या संकटामुळे शिबिरासाठी भूमी न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साधू आणि संत त्यांच्या छावण्या आणि आश्रम येथे रहातील आणि तेथूनच राजयोगी (शाही) स्नानासाठी येतील. या छावण्यांना प्रशासनाकडून मूलभूत सुविधा पुरवण्यात येणार आहेत. संन्यासी आखाड्यांच्या संतांची व्यवस्था कुठे केली जाईल ?, याविषयी अखिल भारतीय आखाडा परिषद आणि मेळा प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीनंतर ठरवण्यात येणार आहे. प्रशासनाने यापूर्वीच मोठे सत्संग आणि धर्मसभा आयोजित करणे यांवर बंदी घातली आहे.
विविध आखाड्यांकडून संतांसाठी सरकार आणि मेळा प्रशासन यांच्याकडे गंगानदी किनारी शिबिर उभारण्यासाठी भूमी देण्याची मागणी केली जात आहे. काही संतांनी भूमी न मिळाल्यास कुंभमेळ्यावर बहिष्कार घालण्याची चेतावणी दिली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात