संयुक्त राष्ट्रे पर्यावरणाच्या रक्षणासाठी धर्मगुरूंचे साहाय्य घेणार !
- श्रद्धाच पृथ्वीला वाचवण्याची इच्छा निर्माण करू शकते !
- उशिरा का होईना संयुक्त राष्ट्रांना धर्माचे महत्त्व लक्षात आले आहे. आता यातही खर्या अर्थाने कोण पर्यावरणासाठी काम करतो, हे पहाणे महत्त्वाचे आहे. हिंदु धर्मात निसर्ग आणि पर्यावरण यांना पुष्कळ महत्त्व देण्यात आल्याने त्याच्या रक्षणाचा नेहमीच प्रयत्न केला जातो ! त्यामुळे हिंदु धर्मानुसार आचरण केल्यासच खर्या अर्थाने पर्यावरणाचे रक्षण होईल !
नवी देहली : हवामानातील पालट रोखण्याच्या सर्व प्रयत्नांच्या निष्कर्षातून आपण या मतापर्यंत आलो आहोत की, धर्मच ती शक्ती आहे, जी जगातील मोठ्या लोकसंख्येला ‘पर्यावरण योद्धा’ बनवू शकते. विज्ञान आकडेवारी देऊ शकते; मात्र श्रद्धाच पृथ्वीला वाचवण्याची इच्छा निर्माण करू शकते, असे प्रतिपादन ‘संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमां’तर्गत (यू.ए.ई.पी.अंतर्गत) ‘फेथ फॉर अर्थ’ अभियानाचे संचालक डॉ. इयाद अबू मोगली यांनी केले आहे.
जगभरातील धार्मिक संघटना, धर्मगुरु आणि आध्यात्मिक नेते यांच्या साहाय्याने वर्ष २०३० पर्यंत पृथ्वीच्या ३० टक्के भागाला तिच्या मूलभूत नैसर्गिक परिस्थितीत रूपांतर करण्याचा या कार्यक्रमामागील हेतू आहे.
डॉ. इयाद यांचे म्हणणे आहे की, पर्यावरण रक्षणासाठी जगभरातील धार्मिक संघटनांचे जेवढे योगदान मिळायला हवे तेवढे मिळत नाही. जगातील ८० टक्के लोक धार्मिक नैतिकतेचे पालन करतात. यावरून या संघटनांच्या शक्तीचा अंदाज लावता येतो. जर या संघटनांची एकूण संपत्ती एकत्र केली, तर ती जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था असेल. जगातील १० टक्के भूमी या संघटनांच्या नियंत्रणात आहे. ६० टक्के शाळा आणि ५० टक्के रुग्णालये धार्मिक संघटनांकडे आहेत. ही शक्ती मानव कल्याणासाठी मुख्य प्रवाहात आणण्याच्या हेतूने ‘फेथ फॉर अर्थ’ अभियानाचा जन्म झाला आहे. यंदा जगातील धर्मगुरूंची संसद जिनिव्हात होणार आहे. यात ‘धार्मिक इको योद्धा’ही येतील. विज्ञान आणि धार्मिक-आध्यात्मिक नैतिकता जोडून या मोहिमेला व्यापक रूप देतील.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात