Menu Close

देशभरातील हिंदूंची दुःस्थिती रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक ! – प्रमोद मुतालिक, संस्थापक, श्रीराम सेना

कन्नड भाषेतील ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेत धर्मप्रेमींनी केला हिंदु राष्ट्राचा उद्घोष !

बेंगळुरू : देशात आणि हिंदु धर्मात जन्माला आलेल्या आपण सर्वांनीच या देशाला अन् धर्माला समर्पित झाले पाहिजे. जसे रामायणात सीतेचे अपहरण होतांना पाहून जटायूने तिचे रावणापासून रक्षण करण्यासाठी स्वतःकडे तेवढे सामर्थ्यही नाही, हे ठाऊक असूनही लढा दिला आणि स्वतःचा प्राणत्याग केला, त्याप्रमाणेच आपण सर्वांनी जटायूचा आदर्श ठेवून स्वतःचे धर्मकर्तव्य पार पाडायचे आहे. काश्मीरमधून विस्थापित झालेल्यांचे अजून पुनर्वसन झालेले नाही. संपूर्ण देशात काश्मीरप्रमाणे अनेक हिंदूंची दुःस्थिती झाली आहे. ही स्थिती रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक असून त्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे, असे आवाहन श्रीराम सेनेचे संस्थापक श्री. प्रमोद मुतालिक यांनी केले. २१ फेब्रुवारी २०२१ या दिवशी कन्नड भाषेत ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा आणि हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा उपस्थित होते. पू. रमानंद गौडा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सभेचा प्रारंभ करण्यात आला.

धर्माचरणाचे बळच आत्मबळ निर्माण करते ! – पू. रमानंद गौडा

कोरोना महामारीच्या प्रभावामुळे संपूर्ण जग सनातन हिंदु धर्माकडे मोठ्या आशेने पहात आहे. संपूर्ण जगाने दोन्ही हात जोडून नमस्कार करून अभिवादन करण्याच्या पद्धतीचा स्वीकार केला आहे. योग, प्राणायाम, आयुर्वेद, मनःशांती, अध्यात्म आदींकडे संपूर्ण जगातील लोक आज आकर्षित झालेले आहेत. धर्माचरणाचे बळच आपल्यात आत्मबळ निर्माण करते. ‘संपूर्ण विश्‍वालाच सुसंस्कृत करूया’, अशी घोषणा आपल्या पूर्वजांनी केली होती. ती सार्थ करण्यासाठी आपण आपले धर्मकर्तव्य पार पाडूया आणि देशाला हिंदु राष्ट्र बनवून पुन्हा एकदा विश्‍वगुरु स्थानी प्रस्थापित करूया.

छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच हिंदूंना संघटित करून हिंदु राष्ट्राची स्थापना करूया ! – गुरुप्रसाद गौडा

आज आपल्याच देशात निधर्मीवादाच्या नावाखाली हिंदूंना अयोग्य वागणूक आणि केवळ अल्पसंख्यांकांना विशेष सवलती देण्यात येत आहेत. हिंदु धर्मपरंपरा विकृत केल्या जात आहेत. सध्या हिंदूंवर, तसेच मंदिरांवर आक्रमणे होत असून त्याविषयी तथाकथित पुरो(अधो)गामी ‘ब्र’ही काढत नाहीत. देशविरोधी शक्ती भारतात अराजकतेचेे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत. या काळात स्थिर रहाण्यासाठी हिंदूसंघटनांची आवश्यकता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी सर्व मावळ्यांना संघटित केले, त्याप्रमाणे सर्व संघटनांच्या कार्यकर्त्यांना संघटित करून हिंदु राष्ट्राची स्थापना करूया. सर्वांनी धर्मरक्षणाच्या कार्यासाठी एकजुटीने आपसांतील मतभेद विसरून संघटनेच्या बळाचे सामर्थ्य दाखवावे.

श्री. प्रमोद मुतालिक यांनी हिंदु जनजागृती समितीविषयी काढलेले गौरवोद्गार

कोरोनाच्या आपत्काळात मैदानामध्ये जाहीर सभा घेण्यास अडचण असतांनाही ‘ऑनलाईन’ तंत्रज्ञानाचा संपूर्ण उपयोग करून हिंदूंमध्ये जागृती निर्माण करणार्‍या हिंदु जनजागृती समितीचे कार्य स्तुत्य आहे. त्यासाठी मी समितीचे अभिनंदन करतो.

सभा चालू झाल्यावर धर्मांधांकडून होत असलेला विरोध हिंदु धर्मप्रेमींनी संघटितपणे मोडून काढला !

ऑनलाईन सभेला प्रारंभ होताच २ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमी जोडलेले होते. सभा चालू झाल्यावर काही धर्मांधांनी ‘चॅटबॉक्स’मध्ये (संदेशाच्या ठिकाणी) जिहादी संघटनांचे कार्यकर्ते ‘एस्.डी.पी.आय. झिंदाबाद’, ‘हिंदु राष्ट्राची स्थापना करणे शक्य नाही’, ‘ज्यांना हिंदु राष्ट्र हवे आहे, त्यांनी नेपाळला जावे’ अशा प्रकारचे द्वेषपूर्ण संदेश पाठवले. तसेच सभेच्या प्रसारणाला ‘डिसलाईक’ (नापसंती दर्शवणे) करायला प्रारंभ केला. ही प्रक्रिया होत असतांना अनेक हिंदु धर्मप्रेमींनी स्वयंप्रेरणेने हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्राचा जयजयकार करणार्‍या घोषणा ‘चॅटबॉक्स’मध्ये पाठवण्यास प्रारंभ केला अन् धर्मांधांचे षड्यंत्र रोखले.

ऑनलाईन सभेला मिळालेली पूर्वप्रसिद्धी

१६ नियतकालिके आणि २ संकेतस्थळे यांवर ऑनलाईन सभेचे निमंत्रण देण्यात आले. सभेची संपूर्ण माहिती असलेले लेख ३ नियतकालिकांमध्ये, तसेच एका वेबपोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आले. सभेच्या प्रसारानिमित्त बनवण्यात आलेली ध्वनीचित्रफीत १३ चॅनेलवर प्रसारित करण्यात आली.

सभेला मिळालेली प्रसिद्धी

‘प्रवीण कट्टी’, ‘पांचजन्य’, ‘योगायोग’ इत्यादी यू ट्यूब चॅनेल; ‘झी मिडिया’, स्मार्ट न्यूज यांचे फेसबूक पेज; ‘मारिकांबा’ आणि ‘ए.सी.एन्.’ केबल चॅनेल अशा विविध चॅनेलवर सभेचे प्रसारण करण्यात आले.
५ नियतकालिके आणि २ वेबपोर्टल यांवर सभेची बातमी प्रसिद्ध करण्यात आली.
विशेष : या ऑनलाईन सभेचे प्रसारण यू ट्यूब आणि फेसबूक यांसह अन्य वाहिन्यांवर थेट करण्यात आले. त्यामुळे ही सभा ४१ सहस्र ४२६ जणांनी पाहिली.

क्षणचित्रे

  • सभेमध्ये हिंदु धर्म आणि राष्ट्रविषयक ठराव मांडले जात असतांना अनेक धर्मप्रेमी ‘चॅटबॉक्स’मध्ये ‘हर हर महादेव’चा जयघोष पाठवत होते.
  • अनेक धर्मप्रेमींनी समितीच्या कार्यात सहभागी होण्यासाठी स्वतःचा संपर्क क्रमांक दिला.
  • एका धर्मप्रेमींनी सभेच्या निमंत्रणाचा हस्तफलक सिद्ध केला आणि तो हातात धरलेले स्वतःचे एक छायाचित्र सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित केले.
  • काही धर्मप्रेमींनी स्वयंप्ररणेने सभेच्या निमंत्रणाचे भित्तीपत्रक सिद्ध केले आणि ते स्वतःच्या दुकानात किंवा आस्थापनात लावून सभेचा प्रसार केला.
  • एका धर्मप्रेमीने त्याच्या संघटनेतील सदस्यांनी सभेमध्ये सहभागी व्हावे आणि सभेचा प्रसार करावा, यासाठी ऑनलाईन बैठक घेतली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *