हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण, मंदिर संपत्तीची लूट, मंदिर तथा मूर्तींची तोडफोड, मूर्तींची चोरी, देवस्थान तीर्थक्षेत्र परिसरात अन्य पंथीयांकडून होणारा धर्मप्रचार आदी अनेक प्रकारे मंदिरांवर आघात होत आहेत. या विरोधात देशभरातील समस्त मंदिर विश्वस्त आणि धार्मिक संस्था यांना संघटित करून मंदिर संस्कृतीचे रक्षण करणे आवश्यक आहे. यासाठी ‘मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या वतीने 14 मार्च 2021 या दिवशी दुपारी 4.30 ते सायंकाळी 7.00 वाजता ऑनलाईन ‘मंदिर संस्कृति रक्षा राष्ट्रीय अधिवेशन 2021’ घेण्यात येणार आहे. यात अधिकाधिक मंदिर विश्वस्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघा’चे प्रवक्ते श्री. सुनील घनवट यांनी केले आहे.
या राष्ट्रीय अधिवेशनात मंदिरांवर कशा प्रकारे आघात होत आहेत, आघातांच्या विरोधात यशस्वी लढा देणार्या संघटना तथा अधिवक्ते यांचे मार्गदर्शन, तसेच मंदिर संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी ठराव पारित करून पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. यात पाकिस्तानमधील मंदिरांची स्थिती सिंधी समाजाचे पू. संतोष महाराज, काश्मीरमधील मंदिरांविषयी जम्मू येथील अधिवक्ता अंकुर शर्मा, कर्नाटकातील मंदिरांविषयी श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक, महाराष्ट्रातील मंदिरांविषयी हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, तसेच ओडिसा राज्यात होणारी मूर्त्यांची होणारी चोरी, आंधप्रदेशातील मूर्तींची तोडफोड, केरळमधील मंदिरांचे पावित्र्य रक्षण, तसेच अन्य आघातांविषयी विविध वक्ते संबोधित करणार आहेत.
या कार्यक्रमाचे लाइव्ह प्रसारण यू-ट्यूबच्या Youtube.com/HinduJagruti या चॅनेलद्वारे, तसेच फेसबूकच्या Facebook.com/HinduAdhiveshan आणि ट्विटरच्या Twitter.com/HinduJagrutiOrg या माध्यमांतून दुपारी 4.30 वाजता केले जाणार आहे. देशभरातील सर्व मंदिरांचे विश्वस्त, पुरोहित-पुजारी, तसेच मंदिरांविषयी लढा देणारे अधिवक्ता यांनी या अधिवेशनात आवर्जून सहभागी व्हावे, तसेच त्यांनी 70203 83264 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. घनवट यांनी केले आहे.