मुंबई – महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कोरोनाचे कारण दाखवून निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना सेवेत पुन्हा घेण्यात आले. ‘क्राईम इंटेलिजन्स युनिट’ या मुंबई पोलिसांतील महत्त्वाच्या युनिटचा प्रमुख पोलीस निरीक्षक दर्जाचा व्यक्ती असतो; मात्र रातोरात त्या पदावरील व्यक्तीचे स्थानांतर करून साहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जा असलेले सचिन वाझे यांच्याकडे हे पद देण्यात आले. त्यानंतर मुंबईमधील कुठलीही महत्त्वाची ‘केस’ यांच्याकडे जाईल असा प्रकार चालू होता, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी १४ मार्च या दिवशी प्रसिद्धीमाध्यमांपुढे केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले,
१. मी मुख्यमंत्री असतांना माझ्याकडे गृहखाते होते. त्या वेळी शिवसेनेने वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा आग्रह धरला होता. मी अॅडव्हकेट जनरल यांनी मला ‘उच्च न्यायालयाच्या आदेशाने निलंबित झालेले असल्याने वाझे यांना सेवेत घेणे योग्य होणार नाही, तो उच्च न्यायालयाचा अपमान होईल’, असा सल्ला दिला.
२. सचिन वाझे यांचे वाढते महत्त्व आणि त्यांना सरकारचा वाढता पाठिंबा यांमुळे ‘आपण काहीही करू शकतो’ या मानसिकतेतून हे काम झालेले आहे. हे फार गंभीर आहे. या प्रकरणातील एकच भाग बाहेर आला आहे. दुसरा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे.
३. पोलिसमधीलच लोक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होणार असतील, तर कायदा आणि सुव्यवस्था राहील कशी ? म्हणून हा सगळा विषय मी सातत्याने मांडत होतो. दुर्दैवाने सरकारकडून त्यांना पाठीशी घालण्याचे काम सातत्याने होत होते.
४. हे प्रकरण केवळ सचिन वाझे यांच्यापुरते मर्यादित नाही. याला कुणाचा पाठिंबा आहे ? यामध्ये कुणी काय भूमिका निभावली आहे ? या सर्व गोष्टी बाहेर येणे आवश्यक आहे.