Menu Close

कळंगुट येथे चालू करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या ‘सेक्स टॉय शॉप’ला प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्यावर टाळे !

या गोष्टी पोलीस आणि प्रशासन यांना दिसत नाहीत का ? सामाजिक संघटना आणि प्रसारमाध्यमे जागी आहेत म्हणून बरे आहे !

म्हापसा – लैंगिकतेला प्रोत्साहन देणारे भारतातील पहिले ‘सेक्स टॉय आणि वेलनेस प्रॉडक्ट स्टोर’ हे दुकान १४ फेब्रुवारी म्हणजे ‘व्हेलेंटाईन डे’ च्या दिवशी गोव्यात कळंगुट येथे चालू करण्यात आले. (यावरून ‘व्हेलेंटाईन डे’चा प्रेमाशी काही संबंध नसून कामवासनेशी किंवा अश्‍लीलतेशी आहे, हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध होते. ‘व्हेलेंटाईन डे’चे समर्थन करणार्‍या पुरोगाम्यांनी हे लक्षात घ्यायला हरकत नाही ! – संपादक) या दुकानाच्या विरोधात सामाजिक संघटना आणि प्रसारमाध्यमे यांनी आवाज उठवल्यानंतर १६ मार्चपासून हे दुकान बंद करण्यात आले. (अशा अनैतिक गोष्टींविरुद्ध आवाज उठवणार्‍या सामाजिक संघटना आणि प्रसारमाध्यमे यांचे अभिनंदन ! – संपादक)

‘वायज डॉट कॉम’ यांनी दिलेल्या वृत्तानुसार लैंगिकतेला प्रोत्साहन देणारे ‘कामा गिझमो’ हे दुकान १४ फेब्रुवारी या दिवशी तिटो, कळंगुट येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असलेल्या ठिकाणी उघडण्यात आले. ‘कामाकार्ट’ आणि ‘गिझमोसवाला’ यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. या दुकानात लैंगिकतेला प्रोत्साहन देणारे ‘स्प्रे’, ‘कंडोम’ आदींची विक्री केली जात होती. विदेशात अशा स्वरूपाची दुकाने आहेत; मात्र भारतातील हे पहिले दुकान होते. दुकान चालू करणार्‍या आस्थापनांच्या मते सध्याच्या दळणवळण बंदीच्या काळात लैंगिकतेला प्रोत्साहन देणार्‍या वस्तूंच्या ‘ऑनलाईन’ विक्रीमध्ये ६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुकानाला आतून एका औषधालयाचे स्वरूप देण्यात आले होते आणि दुकानात आतून संभाव्य विरोधाला सामोरे जाण्यासाठी दुकानासंबंधी सर्व कायदेशीर अनुज्ञप्त्या प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. दुकानाचे सहसंस्थापक असलेले निरव मेहता प्रसारमाध्यमांना म्हणाले, ‘‘जोपर्यंत अश्‍लीलतेचे प्रदर्शन केले जात नाही, तोपर्यंत लैंगिकतेसंबंधी वस्तूंची विक्री कायद्याने करता येते. येथे दुकानात येणारे ग्राहक दुकानात अधिक वेळ थांबत नाहीत, तर वस्तू घेऊन त्वरित दुकानातून जातात.’’

‘गोंयचो आवाज’ संघटनेने केला होता निषेध !

‘गोंयचो आवाज’ या नव्याने स्थापन झालेल्या संघटनेने या दुकानाच्या विरोधात आवाज उठवला. राज्यात कॅसिनो, अमली पदार्थ यानंतर आता लैंगिकतेला प्रोत्साहन देणार्‍या ‘सॅक्शुअल वेलनेस स्टोर’ला प्रोत्साहन देणार्‍या शासनाचा ‘गोंयचो आवाज’ संघटनेने निषेध केला. या संघटनेचे पदाधिकारी म्हणाले, ‘‘गोव्यात कोणत्याही वस्तूंची विक्री होऊ शकते आणि गोव्यात सर्व तर्‍हेची विकृती आहे. यामुळे गोव्याचे नाव अपकीर्त झाले आहे. या दुकानामुळे सामाजिक स्तरावर, स्थानिकांचे दैनंदिन जीवन आणि युवावर्ग यांच्यावर वाईट परिणाम होणार आहे. गोवा शासनाने गोव्याची संस्कृती अबाधित ठेवून आणि गोमंतकियांना अभिमान वाटेल, अशा पर्यटनाला प्रोत्साहन दिले पाहिजे.’’ या विरोधात आवाज उठवल्यानंतर आणि याविषयी वृत्ते माध्यमांत प्रसारित झाल्यानंतर अखेर अनुमाने १६ मार्च या दिवशी सायंकाळी हे दुकान बंद झाले आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक पंचसदस्य आणि स्थानिक आमदार तथा बंदर कप्तानमंत्री मायकल लोबो यांच्या सूचनेनंतर हे दुकान बंद करण्यात आले आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *