Menu Close

‘मनकर्णिका कुंडाच्या उत्खननाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून भाविकांसाठी कुंड खुले करा’

श्री महालक्ष्मी मंदिरातील मनकर्णिका कुंड खुले करण्याच्या कामास प्रारंभ होणे हा श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीने दिलेल्या लढ्यातील एक विजय !

श्री महालक्ष्मीदेवीचे आशीर्वाद घेऊन झाल्यावर एकत्रित धर्मप्रेमी

कोल्हापूर – हिंदु विधीज्ञ परिषद आणि श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समिती यांनी सर्वप्रथम पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अंतर्गत असलेल्या ३ सहस्र मंदिरांमधील भ्रष्टाचार, अनियमितता, मनकर्णिका कुंडावरील अतिक्रमण यांसह अनेक गोष्टी उजेडात आणल्या. वर्ष २०१५ पासून समिती मोर्चे, आंदोलने, निवेदने, विधानसभा सभागृहात प्रश्‍न उपस्थित करणे, तक्रार करणे अशा विविध मार्गांनी लढा देत आहे. आता श्री महालक्ष्मी मंदिरातील मनकर्णिका कुंड खुले करण्याच्या कामास प्रारंभ होणे हा महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीने दिलेल्या लढ्यातील एक विजय आहे, असे प्रतिपादन श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीचे प्रवक्ते श्री. सुनील घनवट यांनी १७ मार्च या दिवशी व्यक्त केले. कृती समितीच्या वतीने श्री महालक्ष्मीदेवीचा आशीर्वाद घेऊन मनकर्णिका कुंडाच्या उत्खननाच्या कामास भेट दिली त्या वेळी हे मत त्यांनी व्यक्त केले.

या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, कृती समितीचे सदस्य श्री. चंद्रकांत बराले, शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. आदित्य शास्त्री उपस्थित होते.

या प्रसंगी श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीचे श्री. किरण दुसे म्हणाले, ‘‘वास्तविक धार्मिक, ऐतिहासिक, पुरातन असा वारसा लाभलेले मनकर्णिका कुंड खुले होण्याच्या संदर्भात पुरातत्व खात्याने आजपर्यंत केवळ डोळेझाक करण्याच्या पलीकडे काहीच केले नाही. याउलट आता कुंडाचे उत्खनन होण्यास प्रारंभ झाल्यावर त्यातील वस्तूंवर मात्र लगेचच मालकी हक्क सांगितला, हे आश्‍चर्यकारक आहे. इतक्या वर्षांच्या दिरंगाईनंतर या पुढील काळात तरी हे कुंड खुले करण्याच्या कामास विलंब न करता हे काम लवकरात लवकर पूर्ण करून हे कुंड भाविकांना खुले करावे. हे कुंड खुले करतांना ते अधिकाधिक मूळ स्थितीत कसे येईल, यातील तीर्थाचा भाविकांना कशाप्रकारे लाभ घेता येईल, ते पहावे.

विशेष : या वेळी केर्ली येथील सरपंच सौ. उषा माने, धर्मप्रेमी सौ. सन्मती माळी, सौ. वनिता पाटील, सौ. रुक्मिणी वडगावकर, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सुरेखा काकडे आणि सौ. विजया वेसणेकर यांनी श्री महालक्ष्मीदेवीचे आशीर्वाद घेऊन मनकर्णिका कुंडाची ओटी भरली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *