Menu Close

हरिद्वार येथील विविध प्रभागांंमध्ये अस्वच्छतेसह डासांचा उपद्रव

हिंदूंचा पवित्र कुंभमेळा

हिंदूंच्या पवित्र कुंभमेळ्याच्या वेळीही हरिद्वारमध्ये अस्वच्छता असेल, तर अन्य वेळी किती अस्वच्छता असेल, याचा विचारच न केलेला बरा ! तेथे आरोग्य आणि स्वच्छता विभाग आहे कि नाही, असे कुणाला वाटल्यास आश्‍चर्य ते काय ? अशा प्रकारची अस्वच्छता करणारे आणि ती स्वच्छता न करणारे कर्मचारी अशा दोहोंवर शासन काय कारवाई करणार आहे ?

हरिद्वार – हरिद्वारमधील विविध प्रभागांमध्ये योग्य प्रकारे साफसफाई होत नसल्याने ठिकठिकाणी अस्वच्छता निर्माण झाली आहे, तसेच सांडपाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नसल्याने डासांचा उपद्रव वाढला आहे.

सिमेंट रस्त्यांच्या खराब पृष्ठभागामुळे धुळीचे प्रमाण वाढणे

हरिद्वार नगरपालिका क्षेत्रातील मायापूर, हरकी पौडी, भीमगोडा, सप्तर्षी, कनखल, ज्वालापूर, भोपतवाला यांसह अन्य क्षेत्रात योग्य प्रकारे रस्त्यांची साफसफाई होत नाही. काही ठिकाणी डांबरी रस्ते आहेत, तर काही ठिकाणी सिमेंटचे रस्ते आहेत. सिमेंट रस्त्यांच्या पृष्ठभागाचा थर अनेक जागी निघूून गेल्याने या रस्त्यांवर रेतीचे थर साचत आहेत. परिणामी धुळीचे प्रमाण वाढले आहे. सफाई कामगार या मार्गांवरील कागद, पालापाचोळा, प्लास्टिक पिशव्या वरचेवर एका बाजूला जमा करून ठेवतात. त्यामुळे या मार्गावरून एखादी चारचाकी गेली, तरी पादचार्‍यांवर आणि दुकानांमध्ये धूळ उडतांना दिसते.

कचराकुंड्यांची अत्यल्प संख्या

यात आणखी भरीसभर म्हणून सफाई कामगाराने सकाळी एकत्र करून ठेवलेला कचरा टाकण्यासाठी असलेल्या कचराकुंड्या अत्यल्प आहेत. ज्या कचराकुंड्या आहेत, त्याही भरून वाहत असतात. सर्व कचरा नियमित टॅ्रक्टरद्वारे जमा केला जातो; मात्र तो ट्रॅक्टरही वेळेत न आल्याने पुन्हा काही वेळाने रहदारीमुळे कचरा रस्त्यावर पसरला जातो.

तुंबलेल्या गटारांमुळे डासांचे वाढते प्रमाण आणि प्रशासकीय उदासीनता

या ठिकाणचे पावसाळी पाणी वाहून नेण्याचे नाले हे बाराही मास पाण्याने भरलेले असतात. कचरा आणि गाळ यांनी तुंबलेल्या गटारांमधील पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नाही. त्यामुळे डासांच्या उत्पत्तीसाठी अनुकूलता आहे. डासांच्या निर्मूलनासाठी धूर फवारणी आणि ऑईलिंग नियमितपणे केले जात नसल्याचेही येथील रहिवाशांनी सांगितले. सप्तर्षी मार्ग, भोपतवाला यांसह अन्य परिसरात दिवसाही मोठ्या प्रमाणात डासांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. काही ठिकाणच्या रस्त्यांवर जलवाहिन्या फुटून प्रतिदिन शेकडो लिटर पाणी वाया जात असल्याने या परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे.

अनेक ठिकाणच्या गटारांवरील झाकणे गायब असणे

अनेक ठिकाणच्या गटारांवरील झाकणे गायब झाली आहेत. कुंभमधील पवित्र स्नानाच्या दिवशी रस्त्यावरील वाहतूक वाढल्यावर भाविकांना या गटारांंवरून चालावे लागते; मात्र झाकणे नसल्याने आणि काही ठिकाणी रात्रीचे पथदिवे बंद असल्याने या गटारांमध्ये भाविक पडण्याची शक्यता आहे.

या असुविधांविषयी नगरपालिकेच्या एका अधिकार्‍यांना विचारणा केली. त्यावर त्यांनी सांगितले की, राज्य सरकारने वेळीच मनुष्यबळ उपलब्ध करून दिलेले नाही. काही दिवसांपूर्वीच अतिरिक्त मनुष्यबळ देण्याचा निर्णय झाला असून सर्वच कामांना गती येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *