अनिल देशमुख यांच्या घरातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण कह्यात घ्या !
नवी देहली – परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआयकडून) चौकशी करण्याची मागणी केली आहे. यात त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण कह्यात घेण्याचीही मागणी केली आहे. तसेच सरकारी अधिकारी रश्मी शहा यांनी स्थानांतराविषयीचा जो अहवाल सरकारला सादर केला आहे, त्यातीतील सूत्रांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
१. या याचिकेत परमबीर सिंह यांनी त्यांचे स्थानांतर चुकीच्या आणि अवैधपणे करण्यात आल्याचा आरोप केला आहे. किमान २ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच माझे स्थानांतर झाले, असे त्यांनी म्हटले आहे. सिंह यांना मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटवून गृहरक्षकदलाचे महासंचालक करण्यात आले आहे.
२. याचिकेत म्हटले आहे की, स्फोटकांच्या प्रकरणात अन्वेषण योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावे याची मी निश्चिती केली होती. तसेच राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून होणार्या अन्वेषणात कोणताही अडथळा आणला नव्हता. आकसापोटी माझे स्थानांतर करण्यात आले असून केवळ अंदाज आणि पूर्णपणे शक्यतांच्या आधारे निर्णय घेण्यात आला आहे.