Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील हिंदुत्वनिष्ठांच्या ‘ऑनलाईन’ बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

मुंबई – कोरोना महामारीच्या संकटात मागील १ वर्ष अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना प्रत्यक्ष धर्मकार्य करण्यात मर्यादा येत होत्या; परंतु हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून विविध ‘ऑनलाईन’ उपक्रमांद्वारे धर्मप्रेमी उद्योजक, अधिवक्ते, आधुनिक वैद्य आणि हिंदुत्वनिष्ठ जोडले गेले. त्यांच्यासाठी हे उपक्रम म्हणजे नवसंजीवनी होती. या उपक्रमाच्या माध्यमातून व्याख्याने, बैठका आणि धर्मसंवाद यांचे नियोजन नियमित होत असल्याने धर्मसेवेची अमूल्य संधी प्रत्येकाला मिळाली. याच ‘ऑनलाईन’ उपक्रम शृंखलेत उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील हिंदुत्वनिष्ठांसाठी ‘ऑनलाईन’ बैठकीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्मप्रेमी यांची धर्मकार्य, धर्मावरील होणारे आघात, तसेच त्याविषयी संघटनात्मक कृती करण्याविषयीची चर्चा घेतली.

धुळे येथून हिंदू एकता आंदोलन पक्षाचे मनोज घोडके, नगर येथून राष्ट्रीय वारकरी सेना आणि हिंदू एकता आंदोलन पक्षाचे ह.भ.प. बाळासाहेब महाराज जाधव आणि शिरूर येथून भाजपचे विजय नरके आणि हिंदुत्वनिष्ठ केशव लोखंडे यांनी धर्मकार्य करत असतांना आलेले अनुभव उपस्थितांसमोर मांडले.

समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट

श्री. सुनील घनवट यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे हिंदुत्वनिष्ठ जागृत !

या बैठकीला हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी ऐतिहासिक वास्तूंची दयनीय अवस्था आणि त्यावर होत असलेले अतिक्रमण यांविषयी सांगितले. यामध्ये विशाळगडाची दुरवस्था आणि गडावर झालेले अतिक्रमण यांविषयी उपस्थितांना थोडक्यात अवगत केले.

श्री. घनवट यांनी सांगितलेला विषय ऐकून सर्वच धर्मप्रेमींनी ‘अशा प्रकारचे विषय केवळ राज्य किंवा शहर नाही, तर तालुका स्तरापर्यंत नेऊन गावागावांत हिंदु समाजापर्यंत जागृती करण्यासाठीचे प्रयत्न वाढवणे, हेच आपले ध्येय हवे’, असे विचार व्यक्त केले.

‘अशा प्रकारच्या ‘ऑनलाईन’ बैठकांचे आयोजन नियमित करावे’, अशीही मागणी हिंदुत्वनिष्ठांनी केली. ते म्हणाले, ‘‘यामुळे राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांविषयी माहिती आणि जन प्रबोधनासाठी नेमके काय करायला हवे यासाठीची दिशा मिळून हिंदूसंघटनाच्या कार्याला वेग येईल.’’

वंदनीय उपस्थिती

१५ मार्च या दिवशी घेतलेल्या बैठकीला उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा क्षेत्रांतून हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. यामध्ये ह.भ.प. जनार्दन मेटे महाराज, ह.भ.प. प्रभाताई भोंग, ह.भ.प. बाळासाहेब महाराज जाधव आणि ह.भ.प. अरुण महाराज पिंपळे यांची वंदनीय उपस्थिती होती.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *