पुणे – शौर्यापेक्षा श्रेष्ठ असे काही नसल्याने प्रत्येकाने स्वतःमध्ये शौर्याची वृत्ती अंगी बाणवून आनंदी जीवन जगायला शिकले पाहिजे; कारण स्वरक्षण म्हणजे स्वतःच्या रक्षणासहित राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करणे होय. स्वरक्षणासाठी शक्ती, भक्ती आणि युक्ती यांचा संगम हवा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी केले. पुणे येथे आयोजित केलेल्या शौर्यजागृती व्याख्यानात ते बोलत होते.
कित्येक महिलांवर प्रतिदिन अन्याय, अत्याचार होत आहेत. या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी आपल्यामध्ये शारीरिक, मानसिक तसेच आध्यात्मिक बळ हवे. त्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या स्वरक्षण प्रशिक्षणवर्गामध्ये सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
व्याख्यानानंतर व्हिडिओच्या माध्यमातून शौर्य जागवणारी प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. त्यानंतर धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे घोषणा देऊन स्वतः शौर्यजागृती करणारी प्रात्यक्षिके शिकण्याची इच्छा व्यक्त केली. व्याख्यानाचा आरंभ भगवंताला प्रार्थना करून झाला. कु. चैत्राली कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
धर्मप्रेमी महिलांचे अभिप्राय
१. व्याख्यानाने संपूर्ण शरिरात वीरश्री संचारली. स्वरक्षण प्रात्यक्षिक स्वतः आत्मसात करायला हवे, असे वाटले. तसेच समाजामध्येही याविषयी जागृती करण्यासाठी प्रयत्न करीन, असे चंदुर येथील विद्या पाटील यांनी सांगितले.
२. प्रात्यक्षिकांचा व्हिडिओ पाहून स्वरक्षण प्रात्यक्षिके शिकण्याची इच्छा निर्माण झाली, असे मानसी दहिवडकर यांनी सांगितले. तसेच शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर स्वतःचे रक्षण कसे करू शकतो हेही समजले.
वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय
या कार्यक्रमाला ७२ वर्षे वयाच्या ललिता लेले आजी उपस्थित होत्या. त्यांनी प्रशिक्षण शिकण्याची इच्छा व्यक्त केली.
फलनिष्पत्ती
व्याख्यानानंतर १० दिवसांचे शौर्य वर्गांचे नियोजन झाले. त्यानुसार पहिल्या वर्गात १७ प्रशिक्षणार्थी स्वरक्षण प्रशिक्षण शिकण्यासाठी जोडले होते.