व्हॉटस् अॅपवर महापौरांच्या निषेधाची चळवळ
पुणे : देशद्रोहाचा आरोप असलेला कन्हैया कुमार याची पुरोगामी विद्यार्थी युवक संघर्ष समितीच्या वतीने शहरात सभा आयोजित करण्यात आली आहे. आधी सिंहगड रस्त्यावरील राष्ट्र सेवा दलाच्या सभागृहात होणार्या या सभेला पोलिसांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव अनुमती नाकारली. त्यानंतर बालगंधर्व रंगमंदिर येथे सभा घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासाठी बालगंधर्व रंगमंदिर उपलब्ध करून देण्यासाठी महापौरांनी आदेश दिल्याचे समोर येत आहे. (अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देशविरोधी, हिंदुत्वविरोधी वक्तव्ये करून समाजात दुफळी निर्माण करणार्या कन्हैया कुमारच्या कार्यक्रमाला शहराचे प्रथम नागरिक या नात्याने खरे तर महापौरांनी विरोध करायला हवा होता. तो न करता कन्हैया कुमारच्या सभेसाठी सहकार्य करण्याची भूमिका ही देशभक्त नागरिकांच्या भावना दुखावणारीच आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१. बालगंधर्व रंगमंदिरात २४ एप्रिलला गायक श्री. संजीव अभ्यंकर यांचा सुरेल सभा या गायनाचा कार्यक्रम नियोजित होता. त्यासाठी तिकीटविक्रीही चालू होती. कन्हैया कुमारच्या सभेला योग्य जागा उपलब्ध होत नसल्याचे पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौर प्रशांत जगताप यांनी गाण्याचा कार्यक्रम रहित करून सभेसाठी सभागृह उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.
२. या संदर्भात व्हॉटस् अॅपवर कन्हैया कुमारच्या सभेसाठी पदाचा अपवापर करून बालगंधर्व रंगमंदिर उपलब्ध करून देणार्या महापौरांच्या वर्तनाचा धिक्कार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जातीय राजकारणाचा चेहरा उघड अशा पोस्टस् फिरत होत्या.
३. या संदर्भात महापौरांशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले, बालगंधर्व रंगमंदिर हे महानगरपालिकेचे आहे. त्या ठिकाणी होणार्या कार्यक्रमाच्या संदर्भात पालट करण्याचे अधिकार महापौरांना आहेत. कन्हैय्या कुमार याच्या सभेच्या संदर्भात पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून मोकळ्या जागेत कार्यक्रम घेण्यास नकार दिला होता. या कार्यक्रमासाठी बंदिस्त सभागृह उपलब्ध होत नव्हते. या संदर्भात आयोजकांनी माझी भेट घेतली. सभेमुळे कोणताही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सर्व विचार करून बालगंधर्व रंगमंदिर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.