Menu Close

सनातन संस्था ही ईश्‍वराची वाणी ! – स्वामी बोधानंदेंद्र सरस्वती महाराज

हरिद्वार येथील कुंभमेळ्यामध्ये ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’चे उद्घाटन

दीपप्रज्वलन करताना डावीकडून स्वामी विश्‍वात्मानंद सरस्वतीजी, शेजारी स्वामी बोधानंदेंद्र सरस्वती महाराज आणि सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

हरिद्वार – सनातन संस्था ही केवळ संस्था नसून ती ईश्‍वराची वाणी आहे, असे प्रतिपादन मुत्तुरू, कर्नाटक येथील सच्चिदानंद वेद वेदांत पाठशाळेचे स्वामी बोधानंदेंद्र सरस्वती महाराज यांनी केले. कुंभमेळ्यामध्ये हिंदु जनजागृती समिती अन् सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्र’ उभारण्यात आले आहे. याच्या उद्घाटनाच्या प्रसंगी स्वामी बोधानंदेंद्र सरस्वती बोलत होते. या वेळी कर्नाटकमधील स्वामी विश्‍वात्मानंद सरस्वतीजी आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे उपस्थित होते. या प्रदर्शनामध्ये मंदिरांत देवदर्शन कसे घ्यावे, आदर्श दिनचर्या, गोरक्षण, गंगारक्षण, क्रांतीकारांचा गौरवशाली इतिहास, हिंदु राष्ट्र आदी विषयांवर माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत.

या प्रसंगी श्रीफळ वाढवून आणि दीपप्रज्वलन करून मंगलमय वातावरणात उद्घाटन करण्यात आले. शंखनाद आणि वेदमंत्रांच्या जयघोषाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी संतद्वयींचा सन्मान करण्यात आला.

उद्धार होण्यासाठी आपण धर्मकार्य करणे आवश्यक ! – स्वामी बोधानंदेंद्र सरस्वती महाराज

स्वत: धर्माचरण करून इतरांना धर्माचरणास प्रवृत्त केले, तर चांगला समाज निर्माण होईल. ‘सनातन’ हा शब्द वेदांपासून सिद्ध झाला असून वेद ही परमात्म्याची वाणी आहे. धर्मजागृतीविषयीचे हे प्रदर्शन पुष्कळ चांगले आहे. हिमालयात पुष्कळ साधूसंत असून ते आता हे कार्य करण्यासाठी येत आहेत. सनातन हिंदु धर्माचा विनाश होऊ शकत नाही. मुसलमानांनी १ सहस्र वर्षे आपल्यावर राज्य केले, तरीही काही होऊ शकले नाही. सर्वांनी धर्माचरण करणे आवश्यक आहे. आपला उद्धार होण्यासाठी आपण धर्मकार्य केले पाहिजे.

प्रदर्शनाद्वारे धर्माचरणापासून धर्मरक्षणापर्यंत जागृती करण्याचा प्रयत्न ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

सध्या राष्ट्र आणि धर्म संकटात आहे. हिंदूंमध्ये वैचारिक माध्यमातून भ्रम निर्माण केला जात आहे. ज्या राष्ट्राला धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था होती, असे आपले राष्ट्र धर्मापासून दूर जाऊन दिशाहीन होऊ लागले आहे. अशा वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याची प्रेरणा दिली आहे. या प्रदर्शनातून धर्माचरणापासून धर्मरक्षणापर्यंत जागृती करण्याचा प्रयत्न होत आहे. हिंदु धर्मशिक्षणापासून वंचित राहिल्याने आपलेच बांधव धर्माविषयी प्रश्‍न विचारत आहेत. आपल्या धर्मावर वैचारिक आक्रमण होत आहे. हे वैचारिक आक्रमण रोखण्यासाठी हे प्रदर्शन निश्‍चितच लाभदायी ठरेल.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *