Menu Close

कोरोनामुळे महाराष्ट्राची स्थिती चिंताजनक !

  • लस आणि ऑक्सिजन यांच्या तुटवड्यामुळे नागरिकांची ससेहोलपट
  • ‘रेमडेसिविर’ औषधाच्या काळ्या बाजारामुळे नागरिक त्रस्त
  • ९ दिवसांत २ सहस्र ४०१ नागरिकांचा मृत्यू

मुंबई – कोरोनामुळे राज्यातील स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. कोरोनामुळे १ ते ९ एप्रिल या अवघ्या ९ दिवसांच्या कालावधीत राज्यातील २ सहस्र ४०१ नागरिकांना प्राण गमवावा लागला आहे. ८ एप्रिल या दिवशी नगर जिल्ह्यातील अमरधाम या स्मशानभूमीत एकाच दिवशी कोरोनामुळे मृत झालेल्या ४२ जणांवर अंत्यसंस्कार करावे लागले. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे एकाच सरणावर एकाच वेळी ८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहांना अग्नी देण्यात आला. एका बाजूला कोरोनाचे थैमान चालू असतांना दुसर्‍या बाजूला मात्र कोरोनावरील लसीच्या तुटवड्यामुळे राज्यातील बहुतांश लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे, तर कोरोनावरील ‘रेमडिसिविर’ या औषधाचा काळाबाजार चालू आहे. या सर्वांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील ३ दिवसांत राज्यात प्रतिदिन ५० सहस्रांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. एकंदर राज्यातील स्थिती शासन आणि प्रशासन यांच्या हाताबाहेर जात आहे.

‘येत्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ११ लाखांपर्यंत जाऊ शकते’, असे विधान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. अनेक ठिकाणी ‘रेमडेसिविर’ औषधासाठी नागरिक गर्दी करत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी हे औषध चढ्या दराने विकण्यात येत आहे. मुंबईतील जोगेश्‍वरी येथे पोलिसांनी काळाबाजार करणार्‍या एका औषधालयावर धाड टाकून तेथून ‘रेमडिसिविर’चा अवैध साठा कह्यात घेतला. पुणे येथे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाखाच्या वर पोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत राज्यातील ५७ सहस्र ३२९ नागरिकांना प्राण गमावावा लागला आहे.

मुंबईत रुग्णांचा आकडा ५ लाखांच्या वर !

एकट्या मुंबईमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या ११ सहस्र ९१६ इतकी झाली आहे, तर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५ लाख १ सहस्र १८२ इतकी झाली आहे.

लसीकरण केंद्रे बंद पडल्यामुळे नागरिक माघारी !

मुंबईतील ‘बीकेसी’ येथील सर्वांत मोठ्या लसीकरणकेंद्रावर लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असतांना लस संपल्यामुळे नागरिकांना परत जावे लागले.

मुंबईतील खासगी लसीकरण केंद्रांतील लसीकरण बंद करण्यात आले आहे. चंद्रपूर  जिल्ह्यात ९८ पैकी ९१ लसीकरण केंद्रे लस उपलब्ध नसल्यामुळे बंद पडली आहेत. राज्यातील सर्वच जिल्ह्यांत लसींचा अल्प साठा शेष असल्यामुळे प्रशासनापुढे अडचण निर्माण झाली आहे.

गावाला जाणार्‍या अन्य राज्यांतील कामगारवर्गामुळे प्रशासनावर ताण !

दळणवळण बंदी अधिक कडक होण्याच्या भीतीने मुंबईतील दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वांद्रे टर्मिनस, बोरीवली, मुंबई सेंट्रल, लोकमान्य टिळक टर्मिनस येथे गावाला जाणार्‍या अन्य राज्यांतील नागरिक मोठी गर्दी करत आहेत. बिहार, उत्तरप्रदेश आदी राज्यांत जाणार्‍या रेल्वे कामगार वर्गाने भरून जात आहेत. गर्दी नियंत्रित करण्यासाठी प्रशासनावर ताण येत आहे. अखेर मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवर ‘प्लॅटफॉर्म’ तिकिट देणे बंद करण्यात आले आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *