हरिद्वार येथील कुंभमेळ्यात हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’
हरिद्वार – आदिवासींचे धर्मांतर रोखून त्यांना मूळ धर्मात आणण्याची आवश्यकता आहे. मी स्वतः अनेक ग्रामीण गावांत जाऊन सर्व आदिवासींच्या समस्या समजून घेतो, तसेच जे आदिवासी पीडित आहेत, त्या सर्व आदिवासी समाजाशी मी जोडलेलो आहे. तसेच धर्मांतर झालेल्या आदिवासी लोकांना मूळ धर्मात आणले आहे; मात्र या कारणास्तव माझ्या विरोधात षड्यंत्र रचून मला फसवण्याचा प्रयत्न केला गेला; परंतु मी आदिवासींना संघटित करून याला कडाडून विरोध करून हिंदूंची शक्ती काय असते, हे दाखवून दिले. त्यामुळे आज सर्व साधू आणि महात्मे यांनी अशा प्रकारे धर्मावरील आघातांच्या विरोधात प्रखरतेने अन् संघटितपणे लढून लोकांपर्यंत पोचण्याची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन कौंडण्यपूर (अमरावती, महाराष्ट्र) येथील श्री रुक्मिणी विदर्भ पिठाचे अनंतविभूषित श्री जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी रामराजेश्वराचार्यजी (माऊली सरकार) यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी अनंतविभूषित श्री जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी रामराजेश्वराचार्यजी यांची भेट घेतली. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते. या वेळी कुंभमेळ्यात लावण्यात आलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला भेट देण्याचे निमंत्रण देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी श्री. संजीव पुंडिर उपस्थित होते.
देशातील प्रशासकीय व्यवस्थेत एक प्रकारे ‘वर्णाश्रम’ व्यवस्थाच चालू !
अनंतविभूषित श्री जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी रामराजेश्वराचार्यजी मार्गदर्शन करतांना म्हणाले, ‘‘धर्मनिरपेक्ष देशातील प्रशासकीय व्यवस्थेत एक प्रकारे ‘वर्णाश्रम’ व्यवस्थाच चालू आहे. त्याला लोकांची मान्यता आहे; मात्र हिंदु धर्मातील वर्णाश्रमाविषयी बोलल्यानंतर त्याला विरोध केला जातो. वर्णाश्रमातील ‘ब्राह्मण’ म्हणजे ज्ञानाचे कार्य, ‘क्षत्रिय’ म्हणजे रक्षण करणारा, ‘वैश्य’ म्हणजे अर्थव्यवस्थेतून साहाय्य करणारा आणि ‘शुद्र’ म्हणजे सेवाकार्य करणारा आहे. याकडे अशा दृष्टीतून पहाण्याची आवश्यकता आहे. ‘मनुस्मृती’विषयी अफवा पसरवण्यात आली. वास्तविक ‘मनुस्मृती’मध्ये स्त्रियांना पूजनीय मानले असून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केेले जाते.’’