Menu Close

५ राज्यांतील निवडणुकांमध्ये प्रचंड प्रमाणात कोरोना रुग्णांची वाढ !

बंगालमध्ये ४२० टक्के, तर आसामामध्ये ५३२ टक्के रुग्णवाढ !

यासाठी आता कुणाला उत्तरदायी ठरवायचे ?

नवी देहली – गेल्या १५ दिवसांचा विचार केल्यास विधानसभा निवडणुका असलेल्या ५ राज्यांमध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचे पहायला मिळत आहे. १ ते १४ एप्रिल या कालावधीत आसाममध्ये ५३२ टक्के, बंगालमध्ये ४२० टक्के, तमिळनाडूमध्ये १५९ टक्के, पुद्दुचेरीत १६५ टक्के, तर केरळमध्ये १०३ टक्क्यांनी कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याची माहिती समोर आली आहे. या राज्यांतील कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण ४५ टक्क्यांनी वाढले आहे. बंगालमधील ४ टप्प्यांचे मतदान अद्याप व्हायचे आहे. त्यामुळे येथील आकडा काही दिवसांनी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

१. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत १६ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत आसाममध्ये केवळ ५३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती, तर केवळ ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता; मात्र १ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत ३ सहस्र ३९८ जणांना कोरोनाची लागण झाली आणि १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

२. बंगालमध्ये १६ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत ८ सहस्र कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती, तर ३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला; मात्र १ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत बंगालमध्ये ४१ सहस्र ९२७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले, तर १२७ जणांचा मृत्यू झाला.

३. पुद्दुचेरीमध्ये नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत प्रतिदिन केवळ ५० नव्या रुग्णांची नोंद होत होती. १६ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत १ सहस्र ४०० नवे रुग्ण आढळून आले होते, तर ९ जणांचा मृत्यू झाला; मात्र १ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत ३ सहस्र ७२१ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली, तर १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

४. तमिळनाडूमध्ये १६ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत २५ सहस्र कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती, तर १६३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता; मात्र १ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत कोरोनाबाधितांची संख्या ६५ सहस्रांच्या घरात गेली असून याच काळात २३२ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला.

५. केरळमध्ये १६ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत ३० सहस्र ३९० नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती, तर १९९ जणांचा मृत्यू झाला होता; मात्र १ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत ६१ सहस्र ७९३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली, तर २०४ जणांचा मृत्यू झाला.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *