Menu Close

गुढी हा आमचा धर्म, धर्माचरण आणि धर्माभिमान आहे ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

पुणे येथे छत्रपती संभाजी महाराज बलीदानदिन आणि गुढीपाडवा यांनिमित्त ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यान संपन्न !

श्री. सुमित सागवेकर

पुणे – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी ४० दिवस पापी औरंगजेबाचे अत्याचार सहन केले; पण त्यांनी हिंदु धर्म सोडला नाही म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन नव्हे, तर त्यांचा शौर्यदिन आम्ही मानतो; पण आज त्या महापुरुषाचे नाव घेऊन धर्मद्रोही लोक हिंदु धर्माविरोधात प्रचार करतात, हे अत्यंत लज्जास्पद आहे. गुढी हा आमचा धर्म, आमचे धर्माचरण आणि आमचा धर्माभिमान आहे; कारण केवळ मानवजातीचेच नव्हे, तर अखंड सृष्टीचे नववर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेला चालू होते, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी केले. ११ एप्रिल या दिवशी असलेला छत्रपती संभाजी महाराज बलीदानदिन आणि १३ एप्रिल या दिवशी असलेला गुढीपाडवा या दोन्हीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानात ते बोलत होते.

श्री. सुमित सागवेकर पुढे म्हणाले, ‘‘वर्ष १६८९ मध्ये औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना फाल्गुन अमावास्येच्या दिवशी हालहाल करून मारले. दुसर्‍या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदा, म्हणजेच ‘गुढीपाडवा’ हा हिंदूंचा नववर्षदिन होता. हिंदूंनी तो साजरा करू नये, असा औरंगजेबाचा त्यामागे हेतू होता; मात्र त्याचे हे पाप झाकण्याचा प्रयत्न धर्मद्रोही लोक गुढीपाडव्याविषयी अपप्रचार करून करत आहेत का ?, असे त्यांना ठणकावून विचारले पाहिजे.’’

धर्मद्रोह्यांकडून गुढीपाडव्याविषयी होत असलेल्या टीकांचे खंडण करत श्री. सुमित सागवेकर यांनी गुढीचे लिखित संत साहित्यिक संदर्भाचे पुरावे देऊन चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे ‘गुढीपाडवा’ या दिवसाचे नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व समजावून सांगितले अन् हिंदूंच्या वैदिक गणित पद्धतीनुसार प्राचीन हिंदु धर्माची महान कालगणना स्पष्ट केली. १५ निखर्व, ५५ खर्व, २१ अब्ज, ९६ कोटी, ०८ लाख, ५३ सहस्र, १२३ वा यंदाचा गुढीपाडवा आहे, असे सांगून सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्या वेळी उपस्थित सर्व हिंदू धर्मप्रेमींना हिंदु धर्माची महानता लक्षात आली.

श्री. केतन पाटील यांनी उपस्थितांना हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा दिली. ११६ धर्मप्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. व्याख्यानाचा आरंभ श्रीकृष्णाच्या श्‍लोकाने तर सांगता कृतज्ञता व्यक्त करून झाली. व्याख्यानाचे सूत्रसंचालन कु. प्रियांका जाधव यांनी केले. शौर्यजागृती व्याख्यान उत्साहपूर्ण आणि क्षात्रतेजाने भारलेल्या वातावरणात पार पडले.

उपस्थितांचे वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय

अंजली कुंभार – गुढीपाडव्याचे कितवे वर्ष चालू आहे, एवढी सखोल माहिती नव्हती, ती या व्याख्यानातून स्पष्ट झाले. पुष्कळ चांगली माहिती मिळाली.

रमेश सावंत – ऐकतांना पुष्कळ उत्साह वाटला. दैवी तत्त्व जाणवत होते.

विपुल ठोके, कराड – व्याख्यान ऐकल्यानंतर हिंदु असल्याचा अभिमान जागृत झाला.

मृणाल मनमाडकर – मी ८ वीत आहे. आमच्या शाळेतही चुकीची माहिती पसरवली जात आहे. माहिती ऐकून शौर्य जागृत झाले. माझ्या मैत्रिणींना मी ही माहिती सांगीन.

कीर्ती महाजन, कोथरूड, पुणे – पुष्कळ वैशिष्ट्यपूर्ण आणि चांगली माहिती मिळाली. प्रत्येक शब्दांतून क्षात्रतेज जाणवत होते.

श्री. गणेश गायकवाड, संभाजीनगर – फेसबूक आणि व्हॉट्सअ‍ॅपला चुकीची माहिती मिळत होती. गुढीपाडव्याच्या संदर्भातील खरा इतिहास आज नेमकेपणाने कळला.

सोनाली – व्याख्यान ऐकून आपण हिंदु आहोत आणि या पावन भूमीवर आपल्याला साधना करण्यासाठी जन्म मिळाला, याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *