सातारा – वाई तालुक्यातील ओझर्डे गावाचे सैनिक सोमनाथ अरविंद तांगडे हे सिक्कीम येथील कॉलिंगपाँग येथील बर्फाच्या टेकडीवर कर्तव्य बजावत होते. बर्फाच्छादीत प्रदेशात आलेल्या वादळी वार्याने आणि पावसाने गंभीर घायाळ झालेले तांगडे हे रुग्णालयात उपचार चालू असतांना हुतात्मा झाले.
८ एप्रिलच्या मध्यरात्री ३ वाजता तांगडे आणि त्यांचे २ सहकारी कर्तव्यावर होते. तेव्हा आलेल्या वादळी वार्याने आणि पावसाने सैनिकांचे तंबू उखडून पडले. त्यामुळे तांगडे आणि त्यांचे सहकारी रात्रभर थंडीने कुडकूडत बसले. तांगडे यांना चक्कर येऊन ते बर्फावर आदळले आणि गंभीर घायाळ झाले. त्यानंतर सोबतच्या सैनिकांनी तांगडे यांना कॉलिंगपाँग येथील सैनिकी रुग्णालयात भरती केले. तेव्हापासून ते बेशुद्धावस्थेत होते. १६ एप्रिल यादिवशी उपचार चालू असतांना त्यांचा मृत्यू झाला.