Menu Close

बेंगळुरूमध्ये कोरोनाबाधितांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांकडून अवैधरित्या घेतले जात आहेत ३५ ते ४० सहस्र रुपये !

भारतियांच्या नैतिकतेचे किती अधःपतन झाले आहे, हे दाखवणारी ही लज्जास्पद घटना ! अशांना अटक करून त्यांना आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा दिली पाहिजे !

प्रतिकात्मक छायाचित्र

बेंगळुरू – येथील खासगी रुग्णालयात मृत पावलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांचे मृतदेह त्यांच्या नातेवाइकांकडे सुपुर्द केले जात नाही, तर रुग्णवाहिकेतून बेंगळुरू महापालिकेने ठरवलेल्या विद्युत दाहिनीत आणून अंत्यसंस्कार केले जात आहेत. गेल्या आठवड्यापासून कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे गेल्या २ दिवसांपासून स्मशानासमोर शववाहिन्यांची रांग लागली आहे. याचा दुरुपयोग करून घेणार्‍या खासगी रुग्णवाहिका आणि पालिकेचे काही कर्मचारी अंत्यसंस्कार तात्काळ करण्यासाठी लोकांकडून ३५ ते ४० सहस्र रुपये घेत आहेत. पैसे दिले नाहीत, तर अंत्यसंस्कारासाठी एक दिवस वाट पहावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यास नागरिकांकडून विरोधही होत आहे.

सोमनहळ्ळी येथील मृताचे नातेवाईक म्हणाले की, अंत्यसंस्काराच्या नावावर लूट चालली आहे. रुग्णवाहिकेसाठी १३ सहस्र रुपये, पूजेच्या नावाखाली १० सहस्र रुपये, विद्युत दाहिनीत दहन करण्यासाठी ६ सहस्र ५०० रुपये, नातेवाइकाला पी.पी.ई. किट देण्यासाठी १ सहस्र रुपये आणि कर्मचार्‍याला ५ सहस्र रुपये असे पॅकेज ठरवण्यात आले आहे. यांतील ५०० रुपये अल्प दिल्याने मला त्रास देण्यात आला. मी कर्ज काढून अंत्यसंस्कार केले. पूजा करतांना एक फूलही नव्हते कि उदबत्तीही नव्हती, तरी १० सहस्र रुपये घेतले गेले. येथे मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार चालू आहे.

कठोर कारवाई करू ! – महापालिका

पालिकेचे आरोग्य सचिव डॉ. के. सुधारकर म्हणाले की, कोरोनासारख्या स्थितीत मृतांच्या नातेवाइकांना लुटणे सहन केले जाणार नाही. खासगी रुग्णवाहिन्या मृतदेह आणण्यासाठी अवैधरित्या पैसे वसूल करत असल्याचे लक्षात आले आहे. या प्रकरणी कठोर कार्यवाही करण्यात येईल. (असे घडत असतांना पालिकेच्या अधिकार्‍यांना कसे कळत नाही कि तेही यात सहभागी आहेत ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *