श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने सोलापूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
सोलापूर – पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांनी धारकर्यांना दिलेली शिकवण आणि त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन अखिल भाविक वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी केले. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सोलापूर विभागाच्या वतीने १२ एप्रिल या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन ह.भ.प. इंगळे महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
१. ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज म्हणाले की, देव, देश आणि धर्म यांसाठी मृत्यू पत्करलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलीदानदिनाच्या दिवशी धारकर्यांनी राज्यभर रक्तदान करून वेगळा आदर्श प्रस्थापित केला आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास प्रत्येकापर्यंत पोचवणे आवश्यक आहे. त्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे.
२. डॉ. हेडगेवार रक्तपेढीत आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी रक्तपेढीचे सचिव सत्यनारायण गुंडला, संचालक मिलिंद फडके, निमंत्रित सदस्य पी.आर्. कुलकर्णी, व्यवस्थापक भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी सचिन देशपांडे आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर विभागाचे धारकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या वेळी ५२ धारकर्यांनी रक्तदान केले. उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला असूनही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने रक्तदान करून रुग्णांना आधार दिल्याविषयी उपस्थितांनी कौतुक केले.