Menu Close

ऑक्सिजन मिळत नसल्याची तक्रार करणार्‍या व्यक्तीला कानाखाली लगावण्याचे केंद्रीय राज्यमंत्र्यांचे उद्दाम उत्तर !

डॉक्टर आणि परिचारिका यांच्याशी अभद्र भाषेत बोलत असल्याने दम दिल्याचे स्पष्टीकरण !

रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा संपल्याने रुग्णांच्या नातेवाइकांचा संयम संपला आहे. त्यामुळे ते आक्रमक होत आहेत. अशा वेळी त्यांना आश्‍वस्त करून त्यांना समजून घेणे आवश्यक आहे. येथे मात्र मंत्रीच अशा प्रकारे रुग्णांच्या नातेवाइकांशी उद्धटपणे बोलत असतील, तर जनतेने कुणाकडे आशेने पहावे ?
सौजन्य : NDTV

दमोह (मध्यप्रदेश) – भोपाळच्या दमोह भागात उभारण्यात आलेल्या एका कोव्हिड केअर सेंटरचे निरीक्षण करण्यासाठी भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल पोचले असता एका व्यक्तीने त्याच्या कोरोनाबाधित आईसाठी ऑक्सिजन सिलिंडर मिळत नसल्याची तक्रार पटेल यांच्याकडे करत त्यांना जाब विचारला. यावर त्याला साहाय्य करण्याऐवजी पटेल यांनी ‘असे बोललास, तर दोन कानाखाली लगावीन’ असे म्हटले. यावर, ‘कानाखाली खाईन; पण ऑक्सिजनची व्यवस्था तर करा’, असे ठामपणे सांगितले. या वेळी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र प्रसारित होत आहे.

१. या व्हिडिओमध्ये पीडित व्यक्ती, ‘हे (मंत्री) सगळे आम्हाला मूर्ख बनवत आहेत. ३६ घंटे उलटले, तरी आम्ही अस्वस्थ आहोत. ऑक्सिजन सिलिंडर देणार असल्याचे सांगितले जात आहे; मात्र ऑक्सिजन काही मिळालेला नाही. ‘ऑक्सिजन नाहीच’, असे यांनी स्पष्टपणे सांगून टाकावे.’

२. पटेल यांनी या व्यक्तीला विचारले, ‘तुम्हाला ऑक्सिजन सिलिंडर देण्यासाठी कुणी नकार दिला आहे का?’ त्यावर ही व्यक्ती म्हणाली, ‘‘हो. मला नकार मिळाला आहे. रुग्णाला केवळ ५ मिनिटांसाठी ऑक्सिजन देण्यात आले. जर ऑक्सिजनची व्यवस्था होत नसेल, तर रुग्णालयाने रुग्णांना भरती करून घेण्यास मनाई करावी.’’

३. या घटनेवर पटेल यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरणही देण्यात आले आहे. त्यांनी म्हटले की, ही व्यक्ती डॉक्टर आणि परिचारिका यांच्या विरोधात अभद्र भाषेचा वापर करत असल्याने मंत्र्यांनी या व्यक्तीला रोखण्याचा प्रयत्न केला.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *