अशा लूटमारीकडे सरकार लक्ष का देत नाही ? आपत्काळात मृताच्या टाळूवरील लोणी खाणार्या समाजातील अशा जनताद्रोही लोकांवर कठोर कारवाई होणे आवश्यक!
बेंगळुरू (कर्नाटक) – कोरोना महामारीमुळे देशातील लोकांची स्थिती चिंताजनक झाली असतांना त्यांना स्वतःच्या नातेवाइकांना वाचवण्यासाठी पराकोटीची धडपड करावी लागत आहे. महामारीमुळे मृतांची संख्या वाढत आहे; मात्र अशा कठीण प्रसंगी मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार अंत्यसंस्कार करणार्यांकडून होत असल्याचे समोर आले आहे. कर्नाटकातील मत्तिकेरे येथे रुग्णवाहिका आणि अंत्यसंस्कार यांच्या खर्चासाठी संबंधितांकडून साडेतीन सहस्रांऐवजी ६० सहस्र रुपयांची मागणी केल्याचे समोर आले आहे. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी ६० सहस्र रुपये मागितल्याने स्वतःचे मंगळसूत्र विकण्यास विवाहित मुलगी सिद्ध झाली.
मत्तिकेरे येथे कोरोनामुळे एका विवाहितेच्या वडिलांचा घरी मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यू झाल्याचे मुलीच्या लक्षात आले नाही. उपचारांसाठी म्हणून ती रुग्णवाहिकेतून वडिलांना चिकित्सालयात घेऊन गेली. त्यांची तपासणी करून ते मृत झाले असल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगितले. शववाहिनीतून शव खासगी शवागारात ठेवण्यात आले. त्यावेळी शव ठेवण्यास, तसेच अंत्यसंस्कारासाठी रुग्णवाहिकेच्या मालकाने ६० सहस्र रुपये मागितले. प्रत्यक्षात एका दिवसाचे शुल्क ३ सहस्र ५०० रुपये आहे. ‘४० सहस्र रुपये दिल्यास फ्लायओव्हरवरून मृतदेह खाली टाकून देईन’, अशी धमकी मालकाने दिली. या घटनेची माहिती एका वृत्तवाहिनीला मिळाल्यावर त्याचे प्रतिनिधी घटनास्थळी पोचले. त्यांना पाहून मालक घाबरला आणि तो १३ सहस्र रुपये घेण्यास सिद्ध झाला. (३ सहस्र ५०० रुपये शुल्क असतांना १३ सहस्र रुपये घेणे, ही सुद्धा लूटच आहे. अशांच्या विरोधात पोलिसांत तक्रार करून त्यांना अटक होऊन कठोर शिक्षा झाली पाहिजे. सरकारने अशा प्रकरणांकडे लक्ष दिले पाहिजे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) विवाहित मुलगी मालकाला मंगळसूत्र विकून ६० सहस्र रुपये देण्यासाठी सिद्ध झाली होती; मात्र तिला ते करावे लागले नाही.