Menu Close

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासह विविध मालमत्तांवर केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या धाडी

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर देशमुख यांच्या विरोधात केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘सीबीआय’ने) प्रथमदर्शी अहवाल नोंदवला. आता सीबीआयने देशमुख यांच्या नागपूर येथील घरासह त्यांच्या विविध १० मालमत्तांवर धाडी टाकल्या.

१. देशमुख यांची सीबीआयकडून चालू असलेली प्राथमिक चौकशी २३ एप्रिल या दिवशी पूर्ण झाली. त्यानंतर देशमुख यांच्या विरोधात प्रथमदर्शी अहवाल (एफ्.आय.आर्.) नोंदवण्यात आला.

२. गेल्याच आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाचे अन्वेषण सीबीआयच्या हाती सोपवले होते. या प्रकरणात गुन्हा नोंद होऊ शकतो कि नाही ?, हे पहाण्यासाठी न्यायालयाने सीबीआयला १५ दिवसांचा कालावधी दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने देशमुख आणि इतरांची चौकशी चालू केली आहे.

काय आहे प्रकरण ?

डावीकडून महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख,परमबीर सिंग

‘अनिल देशमुख गृहमंत्री असतांना त्यांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना १०० कोटी रुपये गोळा करण्याचे उद्दिष्ट दिले होते’, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. नंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचे त्यागपत्र दिले. सीबीआयने देशमुख यांच्या चौकशीसाठी १४ एप्रिलला समन्स बजावले होते. या प्रकरणी सीबीआयने आतापर्यंत अनिल देशमुख यांचे २ स्वीय साहाय्यक संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे अन् त्यांचे २ चालक, बारमालक, मुंबई पोलीस दलातील अधिकारी यांची चौकशी केली आहे. सचिन वाझे यांना उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या बंगल्यासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळणे आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *