Menu Close

उज्जैन या तीर्थक्षेत्राचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व

उज्जैन येथील धार्मिक आणि आध्यात्मिक स्थानांची माहिती पुढे दिली आहे.

ujjain_kumbh

१. रत्नसागर तीर्थ 

देव आणि दैत्य यांनी मिळून केलेल्या समुद्रमंथनातून ज्या वस्तू बाहेर आल्या, त्यांची वाटणी उज्जैनमध्येच केली गेली आणि ती ज्या ठिकाणी केली गेली, त्याला रत्नसागर तीर्थ या नावाने ओळखण्यात येते. समुद्रमंथनातून पुढील गोष्टी बाहेर आल्या.

अ. विष

आ. धन (रत्ने, मोती)

इ. माता लक्ष्मी

ई. धनुष्य

उ. मणी

ऊ. शंख

ए. कामधेनू गाय

ऐ. घोडा

ओ. हत्ती

औ. मदिरा

अं. कल्पवृक्ष

क. अप्सरा

ख. चंद्र

ग. हातांत अमृताचा कलश असलेले भगवान धन्वंतरी

२. मनकामनेश्‍वर मंदिर

जेव्हा भगवान शिवाची तपस्या कामदेवाने भंग केली, तेव्हा केवळ भगवंताच्या दृष्टीक्षेपामुळेच कामदेव भस्म झाला. त्याची पत्नी रती हिने भगवान शिवाला कामदेवाला पुन्हा जिवंत करण्याची प्रार्थना केली. तेव्हा शिवाने तिला क्षिप्रा नदीत स्नान आणि शिवलिंगाची पूजा करण्यास सांगितले. रतीने तसे केले आणि त्यामुळे कामदेव हा तिला पती म्हणून पुन्हा प्राप्त झाला. तिने शिवलिंगाची पूजा केलेले स्थान म्हणजे उज्जैन होय. हे मंदिर आजही मनकामनेश्‍वर मंदिर म्हणून ओळखले जाते.

३. सप्तसागर 

जगात ७ सागरांचे अस्तित्व आहे. सामान्य माणसाला या सातही सागरात स्नान करणे शक्य नाही; म्हणून प्राचीन काळी ऋषींनी उज्जैनमध्येच ७ सागरांची स्थापना केली. ते सागर आजही उज्जैनमध्ये आहेत. उज्जैनमधील ७ सागरांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

अ. रुद्रसागर

आ. विष्णुसागर

इ. क्षीरसागर

ई. पुरुषोत्तमसागर

उ. गोवर्धन सागर

ऊ. रत्नाकर सागर

ए. पुष्कर सागर

या सागरांमध्ये स्नान केल्याने जगातील ७ सागरांमध्ये स्नान केल्याचे फळ मिळते.

४. भगवान महाकाल आणि माता हरसिद्धी

उज्जैनमध्ये आजही राजेशाहीच आहे. प्राचीन काळी जो राजा उज्जैनवर राज्य करत होता, तो आपला महाल उज्जैनच्या सीमेच्या बाहेरच बांधत होता; कारण जो राजा उज्जैनमध्ये झोपेल, त्याचा मृत्यू व्हायचा. याचे कारण म्हणजे उज्जैनचा एकच राजा म्हणजे भगवान महाकाल ! मग एका राज्यात २ राजे कसे राहू शकतील ? येथील राजा भगवान महाकालची राणी म्हणजे माता हरसिद्धी, जी ५२ शक्तीपिठांपैकी एक आहे. कालभैरव हा येथील सेनापती आहे, जेव्हा जेव्हा भगवान महाकाल पालखीत आरूढ होऊन बाहेर पडतो, तेव्हा तेव्हा तो प्रत्यक्षात मदिरेचे सेवन करतो. उज्जैनचे निवासी भगवान महाकालचे स्वागत त्याच प्रकारे करतात.

५. सिद्धवट मंदिर

माता पार्वतीने भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करून घेण्यासाठी एका वटवृक्षाचे रोपण करून त्याच्या खाली बसून घोर तपश्‍चर्या केली. त्यामुळे भगवान शिव तिला पती म्हणून प्राप्त झाला. ज्या वृक्षाखाली तिने तपश्‍चर्या केली, त्या वृक्षाला मोगलांच्या काळात तोडण्यात आले; पण तो वृक्ष त्याच रात्री पुन्हा हिरवागार होऊन आपल्या मूळ स्वरूपात प्रकट झाला. तेव्हा मोगल सैनिकांनी त्याला पुन्हा तोडून त्यावर लोखंड वितळवले; पण तरीही त्याच रात्री तो वृक्ष पुन्हा प्रकट झाला. मग मात्र मोगल सैनिकांनी घाबरून तेथून पळ काढला. क्षिप्रा नदीच्या तटावर तो वृक्ष आजही विराजमान आहे आणि तो सिद्धवट मंदिर या नावाने ओळखला जातो.

६. चिंतामणी गणेश 

भगवान राम आपल्या वनवासाच्या काळात उज्जैननगरीत आले होते. येथे त्यांनी गणपतीची स्थापना केली. मग राम आणि सीता या दोघांनी गणेशाचे पूजन केले. हा गणपति आजही उज्जैनमध्ये चिंतामणी गणेश म्हणून विराजमान आहे. याच मंदिराच्या परिसरात एक विहीर आहे. लक्ष्मणाने माता सीतेची तहान भागवण्यासाठी तेथे बाण मारून विहीर काढली होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *