Menu Close

बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्यात भाजपच्या वतीने निदर्शने

पनवेल येथेही भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांसह कार्यकर्त्यांची निदर्शने !

पनवेल येथे निदर्शने करतांना भाजपचे कार्यकर्ते

पनवेल – बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर मोठ्या प्रमाणात हिंसाचार चालू केला असून त्यात भाजप कार्यकर्त्यांचे खून करण्यात आले आहेत. या राजकीय हिंसाचाराचा उत्तर रायगड जिल्हा भाजपच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली येथे ५ मे या दिवशी येथील पक्ष कार्यालयाजवळ कोरोना संदर्भातील नियम पाळून जोरदार निदर्शने करण्यात आली, तसेच बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी भाजपच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

उपस्थित मान्यवर

आंदोलनात भाजपचे पनवेल शहराध्य जयंत पगडे, नगरसेवक मनोहर म्हात्रे, पंचायत समितीचे सदस्य भूपेंद्र पाटील, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा वर्षा नाईक, माजी नगरसेविका नीता माळी, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, शहराध्यक्ष रोहित जगताप, युवा नेते दिनेश खानावकर, अनेश ढवळे, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, शिक्षक सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष के.सी. पाटील, रवींद्र नाईक, स्नेहल खरे, प्रकाश खैरे यांच्यासह अन्य नागरिक सहभागी झाले होते.

भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांनीही सहभाग घेऊन निषेध नोंदवला !

बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तेथे सूडाचे राजकारण चालू झाले आहे. ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड आक्रमण करत आहेत. भाजप कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांचे दुकान किंवा व्यवसाय यांच्या ठिकाणी आगी लावणे, असे प्रकार घडत आहेत. ही लोकशाहीची हत्या आहे. त्यामुळे त्या निषेधार्थ भाजपाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. विशेष म्हणजे या आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांनीही सहभाग घेऊन घोषणा देऊन बंगालमधील हिंसाचार आणि ममता बॅनर्जी सरकार यांचा निषेध नोंदवला.

हिंसाचारातून ममता बॅनर्जी आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी त्यांचे खरे रूप दाखवले ! – प्रशांत ठाकूर, आमदार, भाजप

प्रशांत ठाकूर

‘‘भाजप देशभरात लोकशाही पद्धतीने काम करत आहे. त्याच अनुषंगाने निवडणुकाही लोकशाही पद्धतीने लढवल्या जातात. बंगालची निवडणूक संपल्यानंतर शांततेच्या मार्गाने कारभार होणे आवश्यक असतांना तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यकर्त्यांची सर्रासपणे हत्या करण्याचे प्रकार चालू झाले आहेत, त्यामुळे हिंसाचारातून ममता बॅनर्जी आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी त्यांचे खरे रूप दाखवले आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याला सांभाळण्याची आवश्यकता होती; मात्र तसे न करता ममता बॅनर्जी सरकारने अत्यंत चुकीचे राजकारण केले. या हिंसाचाराचा आम्ही जाहीर निषेध करतो.’’

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *