हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या ऑनलाईन विशेष चर्चासत्रांतर्गत ‘कोरोना महामारीत मनाला स्थिर कसे करावे ?’ या विषयावर उद्बोधक चर्चासत्र
पुणे – आत्मबळ वाढवण्यासाठी साधना करणे, हा महत्त्वपूर्ण उपाय आहे. आत्मबळ वाढल्यास व्यक्ती कोरोनासारख्या महामारीतही स्थिर राहू शकते. व्यक्तीला कर्मफलन्यायानुसार प्रारब्ध भोग भोगावे लागतात; परंतु साधना केल्यामुळे प्रारब्ध भोगाची तीव्रता न्यून होते, तसेच ते सुसह्य होते. कोरोनासाठीही साधना करणे, हाच उपाय आहे. कोरोनाच्या बातम्या पाहून अनेकांना ताण येत आहे. या ताणापासून मुक्तता मिळवण्यासाठी नामजप केल्यास लाभ होतो. सध्याच्या काळानुसार नामजप करणे, हीच साधना आहे. नामजप केल्यामुळे मन शांत आणि तणावरहित होते. तसेच नामजपाने मनाची शक्ती वाढते. नामजपासह प्रार्थना केल्याने मन:शांती मिळण्यासह ईश्वराची शक्ती मिळते. तसेच अनिष्ट शक्ती आणि नकारात्मक शक्ती यांपासून रक्षण होते. त्यामुळे आजपासूनच साधनेला आरंभ केला पाहिजे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष चर्चासत्रांतर्गत ‘कोरोना महामारीत मनाला स्थिर कसे करावे ?’ या विषयावर आयोजित केलेल्या उद्बोधक चर्चासत्रात ते मार्गदर्शन करत होते. या परिसंवादात हरियाणा येथील वैद्यकीय तज्ञ डॉ. भूपेश शर्मा आणि हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश अन् राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया हेही सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे श्री. चैतन्य तागडे यांनी केले. हा ऑनलाईन कार्यक्रम यू ट्यूबच्या माध्यमातून १६ सहस्रांहून अधिक जणांनी पाहिला.
सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी सांगितलेली अन्य महत्त्वपूर्ण सूत्रे
१. सध्या चालू झालेल्या आपत्काळात तिसरे महायुद्ध होईल. दुसर्या महायुद्धाच्या तुलनेत जगातील जवळपास प्रत्येकच देशाकडे महासंहारक अण्वस्त्रे आहेत. त्यांचा तिसर्या महायुद्धात उपयोग केला जाऊ शकतो. त्यांपासून रक्षण करण्यासाठी अग्निहोत्र करू शकतो.
२. ‘कौशिकपद्धति’ या ग्रंथात आपत्काळाचे वर्णन केले आहे.
‘अतिवृष्टि: अनावृष्टि: शलभा मूषका: शुका : । स्वचक्रं परचक्रं च सप्तैता ईतय: स्मृता: ॥’
(अर्थ : धर्माचरण न केल्यामुळे अतीवृष्टी, अनावृष्टी (दुष्काळ), टोळधाड, उंदरांचा त्रास, पोपटांचा उपद्रव, आपापसांत लढाया आणि शत्रूचे आक्रमण यांसारखी संकटे (राष्ट्रावर) येत असतात.)
उत्पत्ती, स्थिती आणि लय हा कालचक्राचा नियम आहे. युगपरिवर्तन हा ईश्वराचा नियम आहे. यानुसार सध्याचा काळ हा कालचक्रातील परिवर्तनाचा काळ आहे. आपत्तींच्या माध्यमातून सृष्टी संतुलनाकडे चालली आहे. पंचमहाभूतांच्या प्रकोपामुळेही नैसर्गिक आपत्ती येतात. कोरोना महामारीच नव्हे, तर अन्य नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्ती निर्माण होण्यामागे आध्यात्मिक दृष्टीकोनातून अधर्माचरण (धर्मग्लानी) कारणीभूत असते. ‘न मे भक्त: प्रणश्यति ।’ म्हणजे ‘माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही’, असे भगवंताने गीतेत सांगून ठेवलेले आहे; म्हणून आपण साधना करून ईश्वराचे भक्त झालो पाहिजे.
३. मनुष्यजन्मात ६५ टक्के गोष्टी प्रारब्धानुसार घडतात, तर मनुष्याच्या हातात ३५ टक्के क्रियमाण असते. आज समाजातील अनेक व्यक्ती क्रियमाण कर्माचा वापर अयोग्य प्रकारे करत आहेत. पृथ्वीवर रज-तमाचे प्रमाण वाढले की, आध्यात्मिक प्रदूषण वाढते. त्याचा दुष्परिणाम संपूर्ण समाजाला भोगावा लागतो. अशा वेळी बर्याचदा सुक्यासह ओलेही जळते. वर्ष २०१३ ते वर्ष २०२३ हा काळ अत्यंत प्रतिकूल आहे.
४. प्रत्येकाने साधना आणि धर्माचरण केले, तर आपण वैश्विक संकटांचा सामना करू शकतो.
कोरोना विषाणूच्या विरोधात प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी आध्यात्मिक बळ मिळावे, यासाठी करावयाचा नामजप
नामजप हा अनेक रोगांवर उपाय आहे. विकारांमुळे व्यक्तीच्या शरिरात विचित्र कंपने निर्माण होतात. देवतांचा नामजप केल्याने या कंपनांमध्ये सुधारणा होण्यास साहाय्य होते. ‘सनातन चैतन्यवाणी’ या ॲपमध्ये कोरोना विषाणूच्या विरोधात प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी आध्यात्मिक बळ मिळावे, यासाठी सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या माध्यमातून ईश्वराने नामजप सुचवला आहे. ‘३ वेळा श्री दुर्गादेव्यै नमः ।।, १ वेळा श्री गुरुदेव दत्त ।। आणि ३ वेळा श्री दुर्गादेव्यै नमः ।।, १ वेळा ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप दिवसातून १०८ वेळा म्हणजेच १ माळ केल्यास आध्यात्मिक बळ वाढते. आज साधक आणि समाजातील लोक या नामजपाचा लाभ घेत आहेत. कोरोनाची लक्षणे असल्यास हा नामजप प्रतिदिन ३ घंटे करावा. यासह या ‘चैतन्यवाणी’ ॲपमध्ये आत्मबळ आणि प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी मंत्र उपलब्ध आहेत.
याचसमवेत ईश्वराच्या चरणी प्रार्थना केल्याने आत्मशक्ती आणि आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे आपण ‘हे श्रीकृष्णा, या कोरोना महामारीत तूच आमचे रक्षण कर. तुझा भक्त होण्यासाठी आमच्याकडून तळमळीने साधना होऊ दे. कोरोना महामारीत स्थिर रहाण्यासाठी आमचे आत्मिक बळ वाढू दे’, अशी प्रार्थना करू शकतो.
उत्तम आरोग्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या स्तरांवर उपाय करणे आवश्यक ! – डॉ. भूपेश शर्मा, वैज्ञकीय तज्ञ, हरियाणा
- मानसिक आरोग्याचा भारतीय आयुर्वेदात सहस्रो वर्षांपूर्वीच उल्लेख आला आहे. यासह यावर गहन चिंतन आणि मार्गदर्शनही केले आहे. महर्षि चरक यांनी आयुर्वेदात म्हटले आहे की, सर्व रोगांचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कारण अपेक्षा आहे. आपल्या सर्वांना एकमेकांकडून किंवा स्वत:कडून अपेक्षा असतात. त्या पूर्ण झाल्या नाहीत, तर दु:ख होते. क्रोध, अपेक्षा, शोक, भय हे मनाचे विकार असून त्यामुळे मन:स्वास्थ्य बिघडते. भयाने शरिरात वायूची कमतरता निर्माण होते. वायूची गती सामान्य रूपाने होत नाही. क्रोधाने पित्त आणि यकृत यांच्याशी संबंधित रोग होतात, असे आयुर्वेदात स्पष्ट सांगितले आहे.
- मनाला स्थिर केल्यास रोगाशी लढता येते, असे भारतीय दर्शनशास्त्रांत म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही उत्तम आरोग्यासाठी मन स्थिर असण्याला पुष्टी दिली आहे. या संघटनेच्या वतीने मानसिक आरोग्यासाठी समुपदेशनाचे उपक्रम राबवले जातात. ‘ब्रिटीश असोसिएशन ऑफ डर्माटोलॉजिस्ट’ या संघटनेने त्यांच्याकडे येणार्या त्वचारोगी आणि चर्मरोगी यांचा अभ्यास केला. यातून त्यांनी ‘मानसिक तणाव असल्यावर रोग वाढतो’, असा निष्कर्ष काढून रोग्यांना केवळ औषध नाही, तर त्यासह मानसिक आधार देण्यासाठी समुपदेशन चालू केले.
- ‘मनोरुग्णांना सामान्य व्यक्तीच्या तुलनेत फुप्फुसांचे रोग होण्याची शक्यता तिप्पट, तर हृदयरोग होण्याची शंका दुप्पट असते’, असे ‘मेंटल हेल्थ फाऊंडेशन’ने वारंवार सांगितले आहे.
- शारीरिक वा मानसिक रोगात मनाची भूमिका महत्त्वाची आहे. मन हे बुद्धी, शरीर आणि इंद्रीय यांचे संचालन करते. सध्या समाजाची स्थिती कोरोनाच्या भयामुळे बिघडत आहे. जे रोगी नाहीत, त्यांनाही भयामुळे निराशा येत आहे किंवा कोरोनाची लक्षणे आढळत आहेत. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या स्तरांवर उपाय करणे आवश्यक आहे.
- हिंदु संस्कृतीत जेव्हा कुणी शुभकार्यासाठी बाहेर जाते, घरातील मुले जेव्हा परीक्षेसाठी जातात, तेव्हा त्यांना दहीसाखर दिले जाते. दही गोड, सात्त्विक आणि मनाला ऊर्जा देणारे असते, तसेच मनाचे स्थान असलेल्या हृदयाला गोड दह्यातून बळ मिळते. त्यामुळे दहीसाखर खाल्ल्याने आपले मनोबलही वाढते.
- भारतीय योगदर्शनप्रमाणे आसने, प्राणायाम आणि ध्यानधारणा यामुळे इंद्रियांमध्ये स्थिरता येते. अनुलोम-विलोम, सूर्यनमस्कार, कपालभाती भस्त्रिका प्राणायाम हे पुष्कळ उपयुक्त आहेत. योग करण्याच्या वेळांचेही पालन करायला हवे. यांसह स्वतःचा आहारही संतुलित असायला हवा.
सकारात्मक विचार करून एखाद्या योद्ध्याप्रमाणे कोरोनाशी लढायला हवे ! – आनंद जाखोटिया, मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
आज समाज कोरोना महामाराशी झुंजत आहे. आज प्रत्येकाकडे भ्रमणभाष आणि इंटरनेट आहे. या माध्यमांतून कोरोनाविषयी अनावश्यक चर्चा करून व्यक्तीचा तणाव वाढत आहे. आज आपण कोरोना महामारीच्या काळात मनाला सकारात्मक आणि संतुलित कसे ठेवायचे, यावर चर्चा करत आहोत, हे निश्चितच दिशादर्शक आहे. हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मनातील ताणयुक्त विचारांचा आपल्या शरिरावर कशा प्रकारे परिणाम होतो, याचा सखोल अभ्यास करून त्यावर उपचारपद्धत विकसित केली आहे. कोरोनाच्या काळात स्वत:ला कोरोना होईल का ?, माझ्या भविष्याचे आणि कुटुंबियांचे काय होईल ? अशा प्रकारचे चिंतायुक्त विचार करण्यापेक्षा शेजारील व्यक्तीला कोरोना झाला आहे; परंतु मी तरी ठीक आहे. मी काय सतर्कता बाळगू ? कुटुंबियांचे रक्षण कसे करू ? अशा प्रकारच्या सकारात्मक स्वयंसूचना प्रत्येक कुटुंबाने आपल्या दिनचर्येत घेतल्यास संपूर्ण समाजाला त्याचा लाभ होऊ शकतो. त्यामुळे आपण सकारात्मक विचार करून एखाद्या योद्ध्याप्रमाणे कोरोनाशी लढायला पाहिजे.