तिसरे महायुद्ध होणार आहे, हे आतापर्यंत जगातील बहुतेक लोकांना ठाऊक झाले आहे. ते कधी चालू होणार ? हे आता पहायचे आहे, असेच चित्र आहे; मात्र ते केव्हाच चालू झाले आहे आणि त्यात आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे, तसेच अब्जावधी रुपयांची हानी होऊन जगात आर्थिक मंदी निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या गुप्तचरांना सापडलेल्या चीनच्या एका अहवालावरून हे उघड झाले आहे. १८ तज्ञांनी लिहिलेल्या या अहवालामध्ये चीनने ६ वर्षांपूर्वीपासून जैविक शस्त्राद्वारे तिसरे महायुद्ध आरंभ करण्याचे नियोजन चालू केले होते, असे उघड झाले. आताची जगाची स्थिती पहाता चीन यात यशस्वी झाला आहे, हे नाकारता येणार नाही. या युद्धाने युद्धाची परिभाषाच पालटली आहे. पहिली दोन महायुद्धे ही शस्त्रास्त्रांनी लढली गेली. ‘तिसरे महायुद्ध अणूबॉम्बद्वारे लढले जाईल’, ‘अंतराळात लढले जाईल’, असे म्हटले जात असतांना त्याच्याही पलीकडे जाऊन ते जैविक युद्ध म्हणून एकतर्फी लढले जात आहे, असे कुणी म्हटल्यास चुकीचे ठरू नये. एकतर्फी यासाठीच कारण यात आक्रमण कुणी केले आहे ? ते अद्यापही अधिकृतरित्या उघड नाही. त्यामुळे प्रत्युत्तर कुणाला द्यायचे आणि ते कसे द्यायचे ? हेही स्पष्ट नाही. चीन या युद्धाचा कर्ता असला, तरी तसे कोणतेही पुरावे जगाकडे नाहीत. गेल्या वर्षी यावरून चीनवर अमेरिकेसह अनेक देशांनी आरोप केले होते. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणूला थेट ‘चिनी विषाणू’ असे म्हटले होते. त्याला अनेकांनी आक्षेप घेतला होता. यावरून चीनवर कुणीही बोल लावण्यास सिद्ध नाही, हे लक्षात येते. अशा वेळी ‘युद्धाला प्रत्युत्तर कसे देणार ?’, हा प्रश्न उरतो. आज या युद्धाच्या भीषणतेमुळे संपूर्ण जग ठप्प झाले आहे. तरीही आता यातून बाहेर पडण्यात इस्रायल, युरोपमधील काही देश यशस्वी होत आहेत; मात्र भारत त्यात पूर्णपणे पिचला जात आहे, हे लक्षात येते. ‘नियोजनबद्धरित्या काम केले, तरच भारताला यावर मात करणे शक्य आहे’, असे तज्ञांचे म्हणणे आहे; मात्र तसे काही नियोजन होत आहे, असे सध्यातरी दिसत नाही, ही वस्तूस्थिती आहे. याला शासनकर्ते आणि जनता दोघेही उत्तरदायी आहेत. युद्धामध्ये सीमेवर सैन्य लढत असले, तरी जनतेकडून त्यांना मानसिक आणि अन्य आधार दिला जातो. आता प्रत्येक नागरिक हाच सैनिक असला पाहिजे; मात्र नागरिक त्यांचे कर्तव्य पार पाडण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत आणि ठरत आहेत. अशा वेळी केंद्र सरकारने देशांतर्गत आपत्काळ लागू करून कोरोनावर मात करण्यासाठी कंबर कसली पाहिजे. नागरिकांना याचे गांभीर्य सांगून हे कसे ‘युद्ध’ आहे आणि ‘ते भारताला जिंकणे का आवश्यक आहे ?’, याविषयी जागृती केली पाहिजे. कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई करण्यास मागे हटू नये. गेल्या वर्षी चीनने त्यांच्या देशात कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांवर कठोर कारवाई केली होती. त्याला मानवतावाद्यांकडून विरोध करण्यात आला होता; मात्र जेव्हा एखादी गोष्ट रोखायची असते, तेव्हा असेच कठोर व्हावे लागते आणि त्यातूनच यश मिळते, हे चीनच्या आजच्या स्थितीवरून लक्षात घ्यायला हवे. आज संपूर्ण जग विशेषतः भारत कोरोनाच्या विळख्यात असतांना चीनमध्ये लोक मौजमजेमध्ये जीवन जगत आहेत, याचा विचार केला पाहिजे.
जगाने संघटित व्हावे !
या एकतर्फी युद्धामध्ये झालेले हे आक्रमण प्रथम मोडून काढून नंतर प्रतीआक्रमण करण्यास सिद्ध असले पाहिजे; मात्र चीनचे नियोजन पहाता चीनने त्याचाही विचार केला असणार यात शंका नाही. जर त्याचा कट उघड झाला आणि संपूर्ण जगाने त्याच्या विरोधात युद्ध पुकारले, तर त्याने काय केले पाहिजे ? याचे संपूर्ण नियोजन त्याने केलेले असणार यात शंका असू नये. तरीही असे जगाला करावेच लागणार आहे, हे चीनच्या तज्ञांचा गोपनीय अहवाल उघड झाल्यावर म्हणावे लागेल. जीवित आणि वित्त यांची जी काही हानी झाली आहे, त्याला चीन उत्तरदायी असल्याने त्याला शिक्षा देणे हे जगाचे कर्तव्य बनले आहे. त्यासाठी संघटित प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी प्रथम जागतिक आरोग्य संघटनेवर असलेले चीनचे नियंत्रण हटवण्यास कटीबद्ध झाले पाहिजे आणि ‘चीन या कोरोना आक्रमणाला कसा उत्तरदायी आहे ?’, हे सप्रमाण जगासमोर ठेवले पाहिजे. त्यानंतर मित्रराष्ट्रांसह इस्रायल, भारत, मध्य-पूर्वेतील इस्लामी राष्ट्रे, तसेच चीनच्या शेजारील त्याच्यामुळे पीडित असलेली राष्ट्रे यांची मोट बांधून चीनची घेराबंदी केली पाहिजे, असेच म्हणावे लागेल. त्याच वेळेस चीन आणखी भयानक जैविक अस्त्रे जगावर सोडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठीही सिद्ध रहावे लागेल.
विजयाचा उद्घोष करण्यासाठी सिद्ध व्हा !
भारतासाठी सध्याचा काळ अत्यंत कठीण आहे. दुसरीकडे चीन पुन्हा एकदा सीमेवर कुरापती काढण्याच्या प्रयत्नात आहे. चीनच्या सैन्यासमवेत चालू असलेल्या भारतीय सैन्याच्या चर्चेमध्ये चीनने पूर्व लडाखमधील काही भागातून सैन्याला माघारी नेण्यास नकार दिला आहे. चीनने तिबेटमध्ये थिएटर कमांडरची नवी नियुक्ती केली आहे. ‘चीन युद्धाच्या दिशेने नियोजन करत आहे का ?’, अशी शंका आहे. चीन भारताच्या सध्याच्या स्थितीचा अपलाभ उठवत भारतावर आक्रमण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘जेव्हा शत्रूदेशाची अंतर्गत स्थिती चांगली नसते, तेथे अराजकासारखी स्थिती असते, तेव्हाच त्याच्यावर आक्रमण केल्यास विजय मिळतो’, असे युद्धशास्त्रात म्हटले आहे. चीन यानुसार कृती करू शकतो. हे पहाता प्रत्यक्षातील तिसर्या महायुद्धाला तोंड फुटेल, हे नाकारता येत नाही. असे झाले, तर भारत याला कसा सामोरा जाणार ? हा मोठा प्रश्न आहे. अशा स्थितीत देशात अराजक निर्माण झाल्यास आश्चर्य वाटू नये. कोरोनासारख्या एका सूक्ष्मजंतूशी भारतीय लढू शकत नाहीत, त्याचे गांभीर्य जाणू शकत नाहीत, तेथे आताच्या स्थितीत चीनसारख्या एका बलाढ्य शत्रूला ते कसे सामोरे जातील ? हाही मोठा प्रश्न आहे. याचा विचार भारतियांनी केला आहे का ? गेल्या काही दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ बिपीन रावत आणि सैन्यदलप्रमुख मनोज नरवणे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. ही चर्चा कोरोनाच्या संदर्भात सैन्याकडून कसे साहाय्य घेता येईल ? याविषयी होती, असे सांगितले गेले; मात्र ही भेट कदाचित् ‘चीनच्या आक्रमणाच्या शक्यतेमुळे घेतली होती का ?’, अशी शक्यताही निर्माण होते. एकूणच तिसर्या महायुद्धाचा शंखनाद चीनने गुपचूप केलाच आहे. आता हे महायुद्ध संपवून विजयाचा उद्घोष करण्याचे दायित्व संपूर्ण जगाचे आहे !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात