Menu Close

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक लेख प्रसिद्ध केल्याप्रकरणी ‘द वीक’कडून क्षमायाचना !

  • अखंड भारतासाठी स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी करणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानाच्या विरोधात यशस्वी न्यायालयीन लढा देणारे त्यांचे नातू रणजित सावरकर यांचे अभिनंदन !

  • राष्ट्रपुरुषांची अपकीर्ती करणार्‍यांच्या विरोधात केंद्र सरकारने कठोर कायदा करणे आवश्यक !

    स्वातंत्र्यवीर सावरकर

मुंबई – भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सर्वस्वाचा त्याग करणारे आणि क्रांतीकारकांचे ‘मुकुटमणी’ संबोधले जाणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘माफीवीर’ संबोधून ‘द वीक’ या इंग्रजी साप्ताहिकाने त्यांचा अवमान करणारा लेख प्रसिद्ध केला होता. या प्रकरणी ५ वर्षांनी ‘द वीक’ला शहाणपण सुचले असून १५ मे २०२१ या दिवशीच्या अंकात त्यांनी याविषयी जाहीर लेखी क्षमायाचना केली आहे. ‘द वीक’ने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक लेख प्रसिद्ध केल्याच्या विरोधात स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने कायदेशीर लढा अद्यापही चालू आहे.

‘द वीक’च्या २४ जानेवारी २०१६ च्या साप्ताहिकामध्ये ‘लॅम्ब लायनाइस्ड’ या शीर्षकाखाली हा लेख प्रसिद्ध केला होता. याविषयी केलेल्या लेखी क्षमायाचनेत ‘द वीक’ ने म्हटले आहे की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याविषयी आमच्या प्रकाशनाला चुकीचे मार्गदर्शन करून आणि अंधारात ठेवून हा लेख लेखकाने लिहिला. या लेखाशी प्रकाशकाचा काही संबंध नाही.

या प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी ‘द वीक’च्या विरोधात दादर येथील भोईवाडा मुख्य महानगर दंडाधिकार्‍यांकडे फौजदारी खटला प्रविष्ट केला आहे. यामध्ये या लेखाचे लेखक निरंजन टकले, व्यवस्थापकीय संपादक मलयालम मनोरमा कंपनी लि. फिलीप मॅथ्यू, प्रकाशक जेकब मॅथ्यू आणि संपादक टी.आर्. गोपालकृष्णन् यांना आरोपी केले आहे. या प्रकरणी १० डिसेंबर २०१९ या दिवशी सर्व आरोपींना प्रत्येकी १५ सहस्र रुपयांचा जामीन संमत करण्यात आला होता.

वैचारिक आतंकवादाचे प्रसारण करणार्‍या हिंदुद्वेषी पत्रकारितेचे खरे स्वरूप उघड !

जिहादी आतंकवादा एवढाच सध्या हिंदुद्वेष्ट्यांनी प्रसारित केलेला वैचारिक आतंकवाद समाजासाठी घातक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर सातत्याने खोटे आणि विपरीत लिखाण करून त्यांना अपकीर्त करण्याचा प्रयत्न साम्यवादी, पुरोगामी, निधर्मीवादी यांच्याकडून होत आहे. याविरोधात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू तथा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी चिकाटीने न्यायालयीन लढा देऊन हिंदुद्वेषी आणि सावरकरद्वेषी पत्रकारिता उघड केली, याविषयी त्यांचे अभिनंदन ! येणार्‍या काळात साम्यवादी, कथित पुरोगामी आणि निधर्मीवादी यांच्याकडून चालू असलेले वैचारिक प्रदूषण दूर करण्यासाठी विचारवंत हिंदूंना अशाच प्रकारे संघटित होऊन वैचारिक आणि न्यायालयीन लढा द्यावा लागेल. अशा लढ्याला या निर्णयामुळे बळ मिळाले आहे, हे निश्‍चित !

– श्री. नागेश गाडे, समूह संपादक, सनातन प्रभात नियतकालिक.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अपकीर्त करणार्‍यांचे पितळ उघडे पाडणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचा लढा कौतुकास्पद !

श्री. चेतन राजहंस

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ‘माफीवीर’ अशी हेटाळणी करून त्यांना अपकीर्त करण्याचा ‘द वीक’चा डाव स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने न्यायालयीन लढा देऊन हाणून पाडला, यासाठी स्मारकाचे अभिनंदन ! हा सत्याचा विजय आहे.  क्रांतीविरांचे महामेरू असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा मलीन करण्याचे स्वातंत्र्यानंतर जे पद्धतशीर षड्यंत्र चालू आहे, त्याला यामुळे नक्कीच चाप बसणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने  दिलेला हा लढा राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणार्‍या हिंदूंसाठी नक्कीच अनुकरणीय आहे !

– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था.

राष्ट्रपुरुषांचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात यापुढे संयुक्त खटले प्रविष्ट करू ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

श्री. रणजित सावरकर

या प्रकरणी दैनिक ‘सनातन प्रभात’ला प्रतिक्रिया देतांना रणजित सावरकर म्हणाले, ‘‘आपल्या तरुण पिढीसमोर आदर्श उरू नये, यासाठी जाणीवपूर्वक राष्ट्रपुरुषांची अपकीर्ती चालली आहे. चीन आणि पाकिस्तान यांचे भारताशी थेट युद्ध करण्याचे धारिष्ट्य राहिलेले नाही. त्यांच्या पाठिंब्याने असे प्रकार चालू आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर हिंदूंनी एकत्र येणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान म्हणजे राष्ट्रीयत्वाचा अवमान ठरतो. केवळ व्यक्तीनिष्ठेमुळे नव्हे, तर राष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आम्ही हा खटला लढलो. यासाठी अनेक हिंदुत्वनिष्ठ विधीज्ञ संघटनांचे आम्हाला सहकार्य लाभले. एका मोठ्या इंग्रजी वृत्तपत्राने क्षमायाचना करणे, असे प्रथमच झाले आहे. राष्ट्रपुरुषांचा अवमान करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे राष्ट्रपुरुषांच्या अवमानाच्या विरोधात यापुढे संयुक्तपणे खटले प्रविष्ट केले जातील.’’

 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *