विशाळगडावरील अतिक्रमणे हटवा आणि तेथे छत्रपती शिवाजी महाराज अन् नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाचे भव्य स्मारक उभारा ! – श्री. सुनील घनवट
आज 350 वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड-किल्ल्यांच्या पराक्रमाविषयी चर्चा होणे अपेक्षित असतांना ‘विशाळगडाचे इस्लामीकरण रोखा’ या विषयावर चर्चा होत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. जो विशाळगड नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या नावाने ओळखला जायला हवा, तो आज ‘रेहानबाबा दर्गा’ या नावाने ओळखला जात आहे. या गडावर रेहानबाबा दर्ग्याच्या रस्त्यासाठी अन् सुशोभिकरणासाठी शासन 10 लाख रुपये खर्च करते; मात्र नरवीरांच्या समाधींवर छप्पर बांधण्यासाठी शासनाकडे पैसा नाही. काही शिवप्रेमी संघटनांनी स्वखर्चाने या समाधींवर छप्पर बसवले आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी गडावर माहिती देणारे फलक बसवल्यावर ते धर्मांधांकडून काढून टाकण्यात आले. गडावरील घोड्याच्या टापेच्या तीर्थाला रेहानबाबाचे तीर्थ म्हणून सांगितले जात आहे. हे गडाचे इस्लामीकरण नव्हे, तर काय आहे ? गडाची ग्रामदेवता श्री भावजाई मंदिरांचे क्षेत्रफळ 3500 चौरस फूटावरून 700 चौरस फूट कसे काय झाले ? अशा प्रकारे अनेक मंदिरांचे क्षेत्रफळच कमी केले आहे. काही मंदिरांच्या नोंदी गायब झालेल्या आहेत. दुसरीकडे गडावर सुमारे 100 हून अधिक अतिक्रमणे झालेली आहेत. विशाळगडावरील या सर्व अतिक्रमणाला आणि इस्लामिकरणाला पुरातत्त्व खाते उत्तरदायी आहे. ही सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांसह मावळ्यांच्या पराक्रमाचे भव्य स्मारक गडावर उभारावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केली.
‘हिंदु जनजागृती समिती’ आयोजित ‘शिवप्रभूंच्या विशाळगडाचे इस्लामीकरण रोखा’ या ‘ऑनलाईन विशेष परिसंवादा’त ते बोलत होते. हा कार्यक्रम हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ Hindujagruti.org, यू-ट्यूब आणि ट्वीटर यांवर थेट प्रसारित करण्यात आला. 7911 दर्शकांनी हा कार्यक्रम पाहिला.
या कार्यक्रमात बाजीप्रभू देशपांडे यांचे अकरावे वंशज श्री. संदेश देशपांडे म्हणाले की, विशाळगड हा घाटमाथा आणि कोकणातील वाहतूक यांवर लक्ष ठेवण्यासाठी बांधला होता; पण आज या गडावर लक्ष ठेवण्याची वेळ प्रशासनाने आणली आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि शिवप्रेमी संघटना गडाची निगा राखण्यास सिद्ध आहेत; पण पुरातत्त्व खाते त्यांना काही करू देत नाही आणि स्वतःही काही करत नाही, ही शोकांतिका आहे. त्यामुळे गडावरील अनेक मंदिरे शेवटची घटका मोजत आहेत. मूर्ती अभ्यासक श्री. प्रमोद सावंत या वेळी म्हणाले की, पुरातत्त्व खात्याच्या अधिकार्यांना काय करावे, याचे ज्ञान नाही. त्यांना त्यांच्या अंतर्गत येणार्या गोष्टी खडसावून सांगाव्या लागतात. विशाळगडावरील मंदिरे आणि स्मारके यांची कामे स्वखर्चाने करण्यासाठी अनेक स्थानिक संस्था सिद्ध आहेत. तर कोल्हापुरातील ‘सव्यासाची गुरुकुला’चे प्रधान आचार्य लखन जाधव या वेळी म्हणाले की, मध्य प्रदेश, राजस्थान आदी अनेक राज्यांत गड-किल्ल्यांची खूप काळजीपूर्वक जपणूक केली जाते; मात्र महाराष्ट्रात शिवप्रभूंच्या अनेक ऐतिहासिक गड-किल्ल्यांची दुरावस्था झालेली आहे. या वेळी हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री किशोर घाडगे, संभाजीराव भोकरे आणि सुरेश यादव यांनी विशाळगडावरील अतिक्रमणे हटवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा निर्धार व्यक्त केला.