Menu Close

चक्रीवादळाची पूर्वकल्पना असूनही ‘अ‍ॅफकॉन’ आस्थापनाकडून काम चालू ठेवण्याचा आदेश !

  • तौक्ते चक्रीवादळात ‘पी ३०५’ जहाज समुद्रात बुडून ३७ हून अधिक कर्मचार्‍यांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण

  • केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाकडून दुर्घटनेच्या चौकशीचा आदेश

आर्थिक लोभासाठी स्वतःच्या कामगारांच्या जीवाशी खेळणार्‍या या आस्थापनावर सरकारने कठोर कारवाई  केली पाहिजे !

मुंबई – ‘मुंबई हाय’ येथे अरबी समुद्रात तौक्ते चक्रीवादळात सापडलेले ‘पी ३०५’ बुडून त्यातील ३७ हून अधिक कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर ‘आता याला उत्तरदायी कोण ? चक्रीवादळ येणार असल्याची पूर्वकल्पना असूनही जहाज बंदरावर परत का बोलावण्यात आले नाही ?’ असे प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहेत. यामध्ये प्राथमिक स्तरावर तेल उत्खननाचे कंत्राट घेतलेल्या ‘अ‍ॅफकॉन’ आस्थापनाला चक्रीवादळाची पूर्वकल्पना असूनही त्याने काम चालू ठेवण्याचा आदेश जहाजाच्या कॅप्टनला दिला होता. त्यामुळे कॅप्टननेही चक्रीवादळातच उत्खननाचे काम चालू ठेवले असल्याचा धक्कादायक प्रकार आता उघड झाला आहे. यामुळे केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाकडून या दुर्घटनेचे अन्वेषण करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

या दुर्घटनेत सापडलेल्या १८८ कर्मचार्‍यांचा जीव वाचवण्यात नौदल आणि तटरक्षक दल यांना यश आले. अद्यापही ३८ कर्मचारी बेपत्ता असून त्यांचा शोध चालू आहे. समुद्रात भरकटलेली ३ जहाजे आणि १ तेलफलाट यांवरील एकूण ६११ जणांना आतापर्यंत सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.

‘ऑईल अ‍ॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन’ने वादळाच्या सूचनेकडे दुर्लक्ष का केले ? – नवाब मलिक, अल्पसंख्यांकमंत्री

या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करतांना अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक म्हणाले की, तौक्ते चक्रीवादळ समुद्र किनारपट्टीवर जोरदार धडकणार, हे संबंधित यंत्रणेने सांगितलेले असतांनाही ‘ऑईल अ‍ॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन’ने (‘ओ.एन्.जी.सी’ने) या सूचनेकडे दुर्लक्ष का केले ? सुरक्षेच्या नियमांचे पालन का केले नाही ? कामगारांच्या मृत्यूला उत्तरदायी असणार्‍यांवर कडक कारवाई व्हायला हवी.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *