Menu Close

भारतात ‘ब्लॅक फंगस’ नंतर आता ‘व्हाईट फंगस’चेही रुग्ण सापडले !

कोरोनाबाधितांना धोका असल्याचे तज्ञांचे मत !

व्हाईट फंगस

नवी देहली – कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ‘ब्लॅक फंगस’ (म्युकरमायकोसिस) या आजाराचा संसर्ग दिसून आल्यानंतर आता ‘व्हाईट फंगस’ची समस्या दिसून येऊ लागली आहे. पाटणा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांमध्ये भरती असलेल्या कोरोनाच्या ४ रुग्णांमध्ये व्हाईट फंगसचा संसर्ग दिसून आला आहे. ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना या आजाराचा धोका अधिक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. या रुग्णालयातील मायक्रोबायोलॉजी विभागाचे अध्यक्ष डॉ. एस्.एन्. सिंह यांनी सांगितले की, हे फंगस रुग्णाच्या त्वचेला हानी पोचवत आहेत. तसेच व्हाइट फंगसचे उशिरा निदान झाल्यास ते जिवावरही बेतू शकते.

 केंद्र सरकारने ‘म्युकरमायकोसिस’चा केला साथरोग कायद्यात समावेश

देशात कोरोनाच्या संसर्गासमवेतच ‘म्युकरमायकोसिस’ अर्थात् ‘काळी बुरशी’ या नव्या आजाराचा केंद्र सरकारने साथरोग नियंत्रण कायद्यामध्ये समावेश केला आहे. देशात वेगवेगळ्या राज्यांमध्ये म्युकरमायकोसिसचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत. तेलंगाणा आणि राजस्थान या राज्यांत याआधीच म्युकरमायकोसिस या आजाराला महामारी घोषित केले आहे.

म्युकरमायकोसिस म्हणजे काय?

‘म्युकरमायकोसिस’ हा बुरशीजन्य आजार आहे. या बुरशीचा हवेतून संसर्ग होते. रोगप्रतिकारकशक्ती चांगली असलेल्यांना यापासून धोका नाही; परंतु रोगप्रतिकारकशक्ती अल्प झालेल्या रुग्णांना याचा तीव्र धोका असतो. नाकावाटे ही बुरशी शरिरात प्रवेश करते. तेथून ती सायनसमध्ये वाढते. कर्करोगाच्या पेशींपेक्षाही जलद गतीने वाढणारी ही बुरशी डोळ्यांतील पेशी, मेंदूतही प्रवेशही करते. त्यामुळे इतर बुरशीजन्य आजारांपेक्षाही हा संसर्ग अधिक धोकादायक आहे. नाकातून काळसर द्रव बाहेर पडणे, नाक सतत वहात रहाणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळ्यांना सूज येणे, डोळे लाल होणे, दृष्टी न्यून होणे, अकारण दात हलणे, दात दुखणे, अशी या आजाराची लक्षणे आहेत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *