तृप्ती देसाई यांचे खरे स्वरूप ! तृप्ती देसाई यांना रोखण्यासाठी विहिंपने कृती करावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
नाशिक : मंदिर प्रवेशाच्या सूत्रावरून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मागे राजकीय वलय असून अप्रत्यक्षरित्या काँग्रेस पक्ष सक्रीय असल्याचा आरोप विश्व हिंदु परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष एकनाथ शेटे यांनी केला आहे, तसेच प्रत्येक वेळी हिंदु धर्मालाच लक्ष्य का केले जाते, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राज्यात सध्या मंदिर प्रवेशाच्या संदर्भात चालू असलेल्या सूत्राच्या पार्श्वभूमीवर विहिंप आणि बजरंग दल यांनी एकत्रितरित्या आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शेटे बोलत होते. या वेळी विहिंपचे जिल्हामंत्री गणेश सपकाळ, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक देविदास वारूंगसे आदी उपस्थित होते.
शेटे पुढे म्हणाले की,
१. देसाई यांच्या कृतीने जनरोष उफाळून काही विघातक घडले, तर शासनावर दबाव आणता येईल, असे षड्यंत्र काही राजकीय पक्षांकडून चालू आहे.
२. देसाई यांनी वर्ष २०११ मध्ये पुण्यातून काँग्रेसच्या वतीने निवडणूक लढवली होती. त्यांची सामाजिक कारकीर्द निवळ राजकीय प्रसिद्धीपुरती मर्यादित आहे.
३. आजवर त्या कोणत्याच सामाजिक चळवळीशी जोडल्या गेलेल्या नाहीत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि योगऋषी रामदेवबाबा यांच्यासह अन्य काही लोकांसमवेत काढलेल्या छायाचित्रांपुरतेच त्यांनी आपले सामाजिक कार्य मर्यादित ठेवले आहे.
४. हिंदु धर्मात स्त्रियांना देवीचे स्थान दिलेले आहे. त्यामुळे स्त्री-पुरुष समानतेला महत्त्व देत प्रत्येक महिलेला मंदिरात प्रवेश दिलाच पाहिजे. (स्त्री-पुरुष समानतेच्या नावाखाली हिंदूंच्या धर्मपरंपरांना पायदळी तुडवणे कितपत योग्य ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) पूजापाठ किंवा प्रवेशाबाबत लिंगभेद नसावा; परंतु याविषयी न्यायालय आणि आंदोलनकर्ते यांनी स्थानिकांशी चर्चा करावी. तेथील परंपरांचे महत्त्व लक्षात घेत कृती करावी.
५. लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील, अशा कृती हेतुपुरस्सर करणार्यांना न्यायालयाने कडक शब्दांत समज द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
बारबालांचे पुनर्वसन, अनाथ मुलांचे संगोपन, विधवा महिलांचे पुनर्वसन, आदिवासी भागातील वंचितांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, असे सामाजिक प्रश्न आहेत. तृप्ती देसाई यांनी आंदोलनातील आक्रमकता आणि सक्रीयता या उपक्रमांमध्ये दाखवावी, असे आवाहन एकनाथ शेटे यांनी केले. (तृप्ती देसाई या सामाजिक प्रश्नी आंदोलन करतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात