इस्रायलने कारगिल युद्धाच्या वेळी भारताला युद्धसामुग्री देऊन साहाय्य केले होते. हे आपण कधीही विसरता कामा नये; पण आज इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील युद्धात आपण पॅलेस्टाईनचे समर्थन करत आहोत, ही मित्राची उपेक्षा कशासाठी ? याच पॅलेस्टाईनने काश्मीरच्या विषयावर सतत भारताच्या विरोधात मतदान केले आहे. काश्मीरमधील जिहादी हिंसाचाराचे समर्थन केले आहे. तो कधीही आपल्या बाजूने उभा राहिलेला नाही. तसेच चीनविषयी आपले धोरण स्वातंत्र्यकाळापासून चुकत आहे. सतत भारताचे भूभाग गिळंकृत केल्यावरही आपण चीनकडे मित्रत्त्वाच्या नात्याने का पाहतो ? आपण चीनला का खडसावत नाही ? याविषयी अमेरिकेचे माजी सचिव माईक पॉम्पिओ यांनी ‘भारताने स्पष्ट भूमिका न घेतल्यास चीन वरचढ होईल’, असे सार्वजनिकरित्या सांगितले होते. त्यामुळे भारताने पॅलेस्टाईन आणि चीन यांविषयी सावध भूमिका न घेता स्पष्ट भूमिका घेऊन इस्रायलच्या बाजूने उभे रहायला हवे, असे रोखठोक प्रतिपादन ‘रूट्स इन काश्मीर’चे संस्थापक श्री. सुशील पंडित यांनी केले. ते ‘हिंदु जनजागृती समिती’ आयोजित ‘आपण तिसर्या महायुद्धाच्या दिशेने जात आहोत का ?’ या ‘ऑनलाईन परिसंवादा’त बोलत होते. हा कार्यक्रम समितीचे संकेतस्थळ HinduJagruti.org, यू-ट्यूब आणि ट्वीटर यांद्वारे 11 हजारांहून अधिक लोकांनी प्रत्यक्ष पाहिला.
या वेळी राजकीय सल्लागार श्री. निशीथ शरण म्हणाले की, वैश्विक प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी अमेरिकेनंतर चीन प्रयत्नशील आहे. त्यामुळे तो ‘कोरोना विषाणूद्वारे जैविक युद्ध कसे लढायचे’ यासाठी अनेक वर्षांपासून प्रयोग करत आहे. यावर अनेक शोधप्रबंध त्यांच्या शास्त्रज्ञांनी सादर केलेले आहेत. या विषयावर ऑस्ट्रेलियाच्या सॅरी मॅक्सन याविषयी विस्तृत पुस्तक लिहित आहेत. त्यामुळे पहिले महायुद्ध हे रासायनिक हत्यारांनी आणि दुसरे महायुद्ध आण्विक हत्यारांनी लढले गेले, तर तिसरे महायुद्ध हे जैविक हत्यारांनी लढले जाईल, असे अमेरिकेसह अनेक तज्ञांचे मत आहे. हे युद्ध काही वर्षांपूर्वीच चालू झालेले आहे. ‘हिंदु जनजागृती समिती’चे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे म्हणाले की, एकूण परिस्थिती पाहता तिसरे महायुद्ध चालू झालेलेच आहे, असे वाटते. या युद्धाच्या प्रसव वेदना जाणवू लागल्या आहेत. युद्धकाळात सीमेवरील सैन्यांप्रमाणे देशांतर्गत सुरक्षेसाठी भारतीय नागरिकांना सैनिक बनून लढावे लागणार आहे. युद्धकाळात अनेक गोष्टी मिळत नाहीत; म्हणून औषधे, पाणी, अन्न, वीज आदींची पर्यायी व्यवस्था करून ठेवावी लागेल. यासाठी सनातन संस्थेने 9 भाषांमध्ये ‘आपत्कालीन सुरक्षा’ नावाचे ‘अँड्राईड अॅप’ चालू केलेले आहे. या वेळी बोलतांना ‘भारत रक्षा मंच’चे राष्ट्रीय सचिव श्री. अनिल धीर म्हणाले की, इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्ध चालू झाल्यावर इस्लायलमधील अरबी लोकांनी दंगली चालू केल्या. तसे भारत-पाक युद्ध झाल्यास भारतातही होऊ शकते; कारण भारतात अनेक संवेदनशील क्षेत्रे आहेत. आपण बंगाल आणि केरळ राज्यांतील हिंसक घटनांवरून अद्याप शिकलेलो नाही. यावर राष्ट्रीय धोरण निश्चित करायला हवे. पंजाबने मुसलमानांसाठी स्वतंत्र जिल्हा बनवला आहे; पण अशीच मागणी अन्य राज्यांतून आल्यास पुढे ते घातक ठरू शकते.