राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा राज्यप्रमुख सुभाष वेलिंगकर यांचे आवाहन !
मांद्रे (गोवा) : शाळांमध्ये प्रादेशिक भाषेतूनच शिकवण्यात येईल, असे आश्वासन दिल्यामुळेच २०१२ मध्ये लोकांनी भाजपला निवडून दिले होते; पण या नेत्यांनी लोकांचा विश्वासघात केला. पुढील निवडणुकीच्या वेळी त्यांना दारासमोर उभेही करू नका, असे आवाहन गोव्याचे रा.स्व. संघाचे प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी एका कार्यक्रमात केले. विशेष म्हणजे गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या मांद्रे मतदारसंघातच हा कार्यक्रम घेण्यात आला.
गोव्यात शाळांच्या माध्यमावरून गेल्या काही मासांपासून वाद चालू आहे. यात सत्ताधारी भाजप आणि भाषाप्रेमी असे दोन तट पडले आहेत. त्यातच रा.स्व. संघाचे स्थानिक नेते भाषेच्या बाजूने असल्याने त्यांचे आणि भाजपचे खटके उडू लागले आहेत.
वेलिंगकर पुढे म्हणाले,
१. मराठी आणि कोकणी भाषेतील शाळांसाठी १२ वेगवेगळे भत्ते देण्याचे आश्वासन भाजप शासनाने दिले होते.
२. सत्तेवर आल्यानंतर ४ वर्षांनी हे भत्ते चालू करण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले होते; पण या भत्त्यांसाठी एकही रुपयाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. केवळ मतदारांच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी हे आश्वासन देण्यात आले होते.
३. राज्यामध्ये भाजपची घसरण होण्याला पक्षाचे नेतेच उत्तरदायी आहेत.
४. भाषेविषयी गोव्यातील लोकांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन चालू केले आहे. आम्ही कोणत्याही स्थितीत खोटे बोलणे खपवून घेणार नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात