Menu Close

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांविरोधात लढण्यासाठी अधिवक्त्यांनी पुढाकार घ्यावा ! – पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय

  • हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधीज्ञ परिषद यांच्या वतीने ‘ऑनलाईन अधिवक्ता परिसंवाद’ !

  • मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि गुजरात येथील अधिवक्त्यांचा परिसंवादात सहभाग

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

मुंबई – समाजात सध्या चालू असलेले अपप्रकार, तसेच हिंदु धर्म, देवता यांचा विविध माध्यमांतून होणारा अवमान, हिंदूंवर कट्टरतावादी धर्मांधांकडून होणारी आक्रमणे या सर्वांच्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट करणे, प्रशासनाला निवेदने देणे आणि पोलिसांत तक्रारी प्रविष्ट करणे आदी सर्व गोष्टी अधिवक्त्यांच्या वतीने होऊ शकतात. यांसह दंगलग्रस्त भागातील पीडित हिंदू आणि गोरक्षक आदी सर्व हिंदू बांधवांना अधिवक्ते वेळोवेळी साहाय्य देऊ शकतात. अधिवक्ते करत असलेल्या कार्याला त्यांनी साधनेची जोड द्यायला हवी. ईश्‍वरावर निष्ठा असेल, तर अशक्यही शक्य होऊ शकते. राष्ट्र-धर्मावर होत असलेल्या आघातांविरोधात लढण्यासाठी अधिवक्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य आणि मुंबई उच्च न्यायालयाचे पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांनी केले. ते मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि गुजरात येथील अधिवक्त्यांसाठी आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन अधिवक्ता परिसंवादा’त बोलत होते. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनीही उपस्थित अधिवक्त्यांना संबोधित केले. या ऑनलाईन परिसंवादाला अधिवक्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी उपस्थित अधिवक्त्यांनी मनोगत व्यक्त करत नियमित साधना करून समाजात घडत असलेल्या चुकीच्या घटनांविरोधात न्यायालयीन लढा देत आपले राष्ट्र अन् धर्मकर्तव्य बजावण्याचा निर्धार केला.

साधना करून अधिवक्त्यांनी हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यात सहभागी व्हावे ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस

भारतातील सामान्य नागरिक कायद्याच्या संदर्भात अनभिज्ञ असतो. अधिवक्ते समाजात लोकांच्या मनात कायद्याविषयी असलेली भीती न्यून करून आत्मविश्‍वास निर्माण करू शकतात. देशात बहुसंख्येने असलेल्या हिंदु समाजाचे शोषण होत आहे, अशा स्थितीत अधिवक्त्यांनी केलेले कायद्याविषयीचे मार्गदर्शन लोकांमध्ये जागृती निर्माण करू शकते. धर्मविरोधी लोक हे राष्ट्र आणि धर्मकार्य यांमध्ये बाधा आणत असून अधिवक्त्यांनी त्यांचे खरे रूप उघड केले पाहिजे. स्वामी विवेकानंद यांनी सांगितल्यानुसार भव्य कार्य करण्यासाठी साधनेचे बळ आवश्यक आहे. साधना करून अधिवक्त्यांनी हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यात सहभाग घ्यावा.

वैशिष्ट्यपूर्ण

१. या परिसंवादात अधिवक्ता पूनम जाधव आणि अधिवक्ता प्रसाद संकपाळ यांनी कोरोना काळातील प्रसंगांवर साधनेने मात करून आलेल्या अनुभवांचे कथन केले, तर अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी हिंदु धर्म आणि साधू-संत यांची अपकीर्ती करणार्‍या ‘वेब सिरीज’च्या विरोधात दिलेल्या न्यायालयीन लढ्याविषयी केलेले प्रयत्न सर्वांसमोर मांडले.

२. या परिसंवादाच्या निमित्ताने अधिवक्ता मुरलीधर क्षीरसागर, अधिवक्ता रणधीर सकपाळ, अधिवक्ता मनीषा परदेशी, अधिवक्ता महेश वेंगुर्लेकर, अधिवक्ता प्रवीण सावंत आदी मान्यवर अधिवक्त्यांनीही आपले अभिप्राय नोंदवले. यात त्यांनी म्हटले की, हिंदुत्व आणि सामाजिक बांधिलकी यांपासून विस्कळीत झालेल्या हिंदु बांधवांना जोडण्यासाठी कार्य करण्यासाठी विस्तृत चर्चा व्हावी, तसेच असे कार्यक्रम भविष्यातही घेण्यात यावेत.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *