‘श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान’ची निवेदनाद्वारे सांगली जिल्हाधिकार्यांकडे मागणी
सांगली – ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी ‘रिनैसंस द स्टेट’ या पुस्तकामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी चुकीची आणि त्यांची अपकिर्ती करणारी माहिती दिली आहे. या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्यकारभाराविषयी अत्यंत खोटी माहिती देण्यात आली आहे. तरी या पुस्तकावर तात्काळ बंदी आणून ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी ‘श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान’ने निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नामवंत इतिहासकारांनी खोटी माहिती खोडून काढून छत्रपती संभाजी महाराज यांचा सत्य आणि जाज्ज्वल्य इतिहास जगासमोर आणला, हे सर्वश्रुत आहे. असे असतांना गिरीश कुबेर यांनी त्यांच्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी खोटी माहिती का समाविष्ट केली ? याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. गिरीश कुबेर यांच्यावर योग्य ती कारवाई झाली नाही, तर ‘श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान’ त्यांना योग्य ते प्रत्युत्तर देईल.
या वेळी ‘श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान’चे संस्थापक श्री. नितीन चौगुले, विनायक माईणकर, सतीश कांबळे, प्रशांत देसाई, प्रशांत गायकवाड, भूषण गुरव, प्रकाश निकम, सचिन देसाई, नीलेश चौगुले उपस्थित होते.