-
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन डॉक्टर परिसंवादा’चे आयोजन !
-
मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि गुजरात येथील मान्यवर डॉक्टरांचा सहभाग
मुंबई – कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग त्रस्त आहे. कोरोनाची पहिली लाट संपते ना संपते, तोच दुसर्या लाटेने सर्वत्र हाहाःकार माजवला आहे. आता अन्य बुरशीजन्य आजारही येत आहेत. काही कालावधीने कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, तसेच वर्षभर वादळ, पूर अशी संकटांची मालिका चालूच आहे. कोरोनावर उपचार करतांना औषधे, ऑक्सिजन, लस हे सर्व उपलब्ध होऊनही लोकांचे मृत्यू होत आहेत. अनेक ठिकाणी प्रशासनासह उपचार करणारे डॉक्टरही परिस्थितीपुढे हतबल झाले आहेत. कोरोनासह प्रत्येक व्याधीवर उपचार करतांना जसा शारीरिक आणि मानसिक कारणांचा विचार केला जातो, तसेच यामागील आध्यात्मिक कारणांचाही विचार होणे आवश्यक आहे. कोरोनाच्या संदर्भात आवश्यक काळजी आणि वैद्यकीय उपचार घेण्यासह नामस्मरणादी उपायही केले पाहिजेत. कोरोना काळात रुग्णांवर औषधोपचार करणार्या डॉक्टरांना सततचे काम आणि स्वत:सह कुटुंबियांना कोरोनाची लागण होण्याची भीती यांमुळे प्रचंड तणावाला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्यासमोर या परिस्थितीत स्थिर रहाण्याचे मोठे आवाहनच आहे. अशा वेळी अष्टांग साधना आणि मनाला सकारात्मक स्वयंसूचना यांचा पुष्कळ लाभ होऊ शकतो, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या डॉ. ज्योती काळे यांनी व्यक्त केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने डॉक्टरांसाठी नुकत्याच आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन डॉक्टर परिसंवादा’त त्या बोलत होत्या. याप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी ‘समाज, राष्ट्र आणि धर्म यांची सद्यःस्थिती अन् डॉक्टरांचे योगदान’ या विषयावर उपस्थित डॉक्टरांना संबोधित केले.
या परिसंवादाला मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांसह गुजरात येथील अनेक मान्यवर डॉक्टर जोडले होते. या ‘ऑनलाईन’ परिसंवादाला उपस्थित डॉक्टरांचा चांगला प्रतिसाद लाभला. या वेळी डॉ. सोनाली भट, डॉ. सुनीता साळुंखे, वैद्या गौरी नरगुंदे-डुबळे यांनी वैद्यकीय उपचारांसह साधना करतांना आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवतांना स्वतःला आलेले अनुभव सर्वांसमोर मांडले. परिसंवादातील शेवटच्या सत्रात ‘डॉक्टर म्हणून रुग्णांवर उपचार करण्यासह आपण राष्ट्र आणि धर्म कार्य करण्यात कसे योगदान देऊ शकतो, तसेच राष्ट्र अन् धर्म यांवरील आघात रोखण्यासाठी करावयाच्या कृती’ यांविषयीही अनेक डॉक्टरांनी मनोगत व्यक्त करून संवाद साधला. या वेळी डॉ. रमाकांत यादव, डॉ. गौतम पाठक, डॉ. चिराग मोदी आणि डॉ. संतोष जालूकर यांनी ‘आम्ही विचारलेल्या शंकाचे निरसन झाले’, असे सांगितले, तसेच त्यांनीही सद्यःस्थितीविषयी त्यांचे निरीक्षण नोंदवले. या परिसंवादाचे सूत्रसंचालन सनातन संस्थेच्या डॉ. ममता देसाई यांनी केले.
‘सेक्युलर’ (निधर्मी) भारतात राज्यघटनेतील ‘समानता’ कुठे आहे ? – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती
१. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने डॉक्टरांसाठी आयोजित केलेले विशेष परिसंवाद आणि नियमित सत्संग या माध्यमांतून मार्गदर्शन घेऊन अनेक डॉक्टर आता नियमित साधना करत आहेत. याच जोडीला त्यांनी भारतात हिंदूंच्या संदर्भात होणार्या दुजाभावाविषयी आपण सजग असणे आवश्यक आहे.
२. आपल्या देशाच्या घटनेतील कलम २८ आणि २९ प्रमाणे अल्पसंख्यांकांना धार्मिक शिक्षण देण्याचे बंधन नाही; मात्र कलम ३० प्रमाणे हिंदूंना धार्मिक शिक्षण देण्यावर निर्बंध आहे. भारतात अल्पसंख्यांकांचे हित जपले जाते आणि बहुसंख्य लोकांना डावलले जाते. यालाच ‘समानता’ म्हणायचे का ?
३. आज विदेशी लोक सनातन संस्कृती अंगीकारत आहेत. असे असतांना भारतात विद्यालयात हिंदूंचा पवित्र ग्रंथ ‘भगवद्गीता’ शिकवणे राज्यघटनेच्या तथाकथित समानतेच्या कसोटीत बसत नाही, ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन ती पालटण्याची मागणी आपण केली पाहिजे.
डॉक्टरांनी व्यक्त केलेले अनुभवकथन
डॉ. सोनाली भट, ठाणे : शारीरिक आणि मानसिक आरोग्य यांवर आम्ही डॉक्टर काम करतोच; पण ‘आध्यात्मिक आरोग्य’ याविषयी केवळ ऐकून होते. याविषयीचे ज्ञान या परिसंवादातून मिळाले. आध्यात्मिक आरोग्यासाठी सत्त्वगुण वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वतःतील दोष घालवावे लागतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेचा अवलंब केल्यासच हे शक्य आहे. यासाठी सनातन संस्थेचे ग्रंथ प्रत्येक घराघरात असले पाहिजेत.
वैद्या गौरी नरगुंदे-डुबळे, मुंबई : प्रत्येक व्यक्तीमध्ये अल्प-अधिक प्रमाणात स्वभावदोष असतात. या स्वभावदोषांमुळे आपल्याला दुःख होते. या सत्संगात सांगितलेल्या स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेचे अनुकरण केल्यास त्याचा निश्चितच लाभ होईल.
डॉ. सुनिता साळुंखे, ठाणे : पूर्वी मनात पुष्कळ विचार असायचे. त्यामुळे मन एकाग्र व्हायचे नाही. या परिसंवादातून मिळालेल्या माहितीनुसार साधना चालू केली. त्यामुळे उत्साह वाढला आणि नामजप एकाग्रतेने होऊ लागला. पुढे पुढे अनावश्यक विचार न्यून झाले. घरातील कामे करतांना आणि वैद्यकीय क्षेत्रात रुग्णांना हाताळतांना साधनेचा लाभ झाला.