Menu Close

३ वर्षांपूर्वी १३ कोटी रुपये व्यय करून झारखंडमधील कांची नदीवर बांधलेला पूल चक्रीवादळाच्या तडाख्याने पडला !

इंग्रजांनी बांधलेले १०० वर्षांपूर्वीचे पूल आजही चांगल्या स्थितीत असल्याची अनेक उदाहरणे आहेत, तर भारतामध्ये सरकारकडून बांधण्यात आलेले पूल हाताच्या बोटावर मोजण्याइतकी वर्षेही टिकत नाहीत, यातून किती भ्रष्टाचार होतो, हे लक्षात येते ! यातून इंग्रजांनी भारताला जितके लुटले नाही, तितके भारतीयच भारताला लुटत आहेत, असे म्हणता येईल !

चक्रीवादळाच्या तडाख्याने पडलेला झारखंडमधील कांची नदीवरील पूल

रांची (झारखंड) – येथील कांची नदीवर ३ वर्षांपूर्वी १३ कोटी रुपये व्यय करून बांधलेला ६०० मीटर लांब असलेला पूल ‘यास’ चक्रीवादळाच्या तडाख्याने पडल्याची घटना घडली आहे. हा पूल रांची जिल्ह्यातील तमाड, बुंडू आणि सोनाहातू या भागांना जोडणारा होता. हा पूल २७ मेच्या दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पडला. ग्रामीण विकास विभागाच्या विशेष प्रमंडळाने हा पूल बांधला होता.

१. बुढाडीह गावातील रहिवाशांनी दावा केला आहे की, या पुलाच्या बांधकामात अनेक त्रुटी राहिल्या. पूल भक्कम रहाण्याच्या दृष्टीने विशेष काही केले गेले नाही. दलदलीमध्येच या पुलाचे खांब उभे केल्यामुळे त्याचा पाया कमकुवत राहिला आणि शेवटी हा पूल आजचे वादळ झेलू शकला नाही.

२. पुलाच्या आसपास नदीच्या पात्रामधून मोठ्या प्रमाणात होणारे अवैध वाळूचे उत्खनन हेसुद्धा पूल पडण्यामागचे एक कारण असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. वाळूतस्कर नदीच्या पात्रात जेसीबी लावून वाळूचे उत्खनन करतात. त्यांना रोखण्यासाठी प्रशासनाकडून अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. (यावरून झारखंड राज्यात पोलीस आणि प्रशासन नाही, असे कुणाला वाटल्यास चुकीचे काय ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)

३. पूल पडल्यानंतर स्थानिक आमदार विकास मुंडा यांनी घटनास्थळाची पहाणी केली. त्यानंतर ते म्हणाले की, यापूर्वीही एक पूल पडला आहे. विशेष म्हणजे दोन्ही पुलांचे बांधकाम एकाच आस्थापनाने केले आहे. (असे आहे, तर त्या आस्थापनाचे नाव काळ्या सूचीत टाकून त्यांच्यावर आतापर्यंत कठोर कारवाई का केली नाही ? – संपादक  दैनिक सनातन प्रभात) त्यामुळे या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून दोषींविरोधात कठोर कारवाई केली पाहिजे. वाळूच्या अवैध उत्खननामुळे याआधी २ पूल पडले आहेत.आता पडलेला हा तिसरा पूल आहे.

४. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार या पुलाचे बांधकाम रांचीमधील कंत्राटदार रंजन सिंह यांनी केले होते. याच कंत्राटदाराने कांची नदीवर बांधलेला अन्य एक पूल २ वर्षांपूर्वी पडला.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *