विदेशी ‘वेगन’ दूधाला भारतात प्रस्थापित करण्यासाठी‘अमूल’च्या दूधाला विरोध करण्याचे ‘पेटा’चे षड्यंत्र !
आज सैन्यबळाशिवाय एखाद्या देशावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. आपली उत्पादने खरेदी करण्यासाठी बाध्य केल्याने त्या देशावर सहज नियंत्रण मिळवता येते. त्यातीलच एक प्रकार म्हणजे ‘पेटा’ने भारतात चालू केलेली ‘वेगन मिल्क’ची (शाकाहारी दूध) चर्चा ! अमेरिकेत सोयाबीनमध्ये जनुकीय परिवर्तन करून त्यापासून ‘वेगन मिल्क’ बनवले जाते. त्यात जास्त प्रथिने असतात. या ‘सोयामिल्क’चा प्रचार करतांना मात्र या पिकावर मोठ्या प्रमाणात विषारी किटकनाशकांचा मारा केला जातो, हे लपवले जाते. भारतात गायीच्या दुधाची मोठी बाजारपेठ आहे. त्यावर विदेशी कंपन्यांचे आधिपत्य निर्माण करण्यासाठीच अमेरिकेतील ‘पेटा’ संस्थेने ‘अमूल’ आस्थापनाला ‘प्राण्याच्या दूधापेक्षा ‘वेगन मिल्क’ बनवण्याचा सल्ला दिला आहे’, असा भांडाफोड हरियाणा येथील अभ्यासक आणि श्री विवेकानंद कार्य समितीचे अध्यक्ष श्री. नीरज अत्री यांनी केला. ते ‘हिंदु जनजागृती समिती’ आयोजित ‘काय आहे ‘पेटा’चे खरे स्वरूप ?’, या ‘ऑनलाईन विशेष परिसंवादा’त बोलत होते. हा कार्यक्रम समितीचे संकेतस्थळ Hindujagruti.org, यू-ट्यूब आणि ट्वीटर यांवर 4797 लोकांनी प्रत्यक्ष पाहिला.
या वेळी ‘पेटा’चे खरे स्वरूप उघड करतांना सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता उमेश शर्मा म्हणाले की, ‘पेटा’चे संकेतस्थळ पाहिल्यावर लक्षात येते की त्यांनी केवळ हिंदूंच्या विविध धार्मिक प्रथा, परंपरा यांच्या वेळी प्राण्यांवर होणारे आघात रोखण्यासाठी लढा दिल्याची उदाहरणे दिली आहेत; मात्र ‘बकरी ईदच्या दिवशी प्राण्याचा बळी दिला जाऊ नये’ म्हणून ते प्रचार करत नाहीत. त्याउलट ते हलाल मांसाचे समर्थन करतात. भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण संस्थेने (FSSAI)ने ‘वेगन मिल्क’ला दूध म्हणून मान्यता दिलेली नसतांनाही केवळ विदेशी कंपन्यांचे हित साधण्यासाठी ‘पेटा’ त्याचा प्रचार भारतात करत आहे. त्यामुळे ‘पेटा’च्या प्रत्येक हालचालीवर केंद्रशासनाने बारीक लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे.
या वेळी बोलतांना हिंदु जनजागृती समितीचे दिल्ली येथील प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे म्हणाले की, ‘भारतात प्राचीन काळापासून प्राणी, वनस्पती, निसर्ग यांची पूजा केली जाते. त्यामुळे भारतात ‘पेटा’सारख्या संस्थांची आवश्यकता नाही. अमेरिकेतच प्रती वर्षी 3.50 कोटी गायी-म्हशी, 12 कोटी डुकरे, 70 लाख लांडगे, 3 कोटी बदक मारले जातात. त्यामुळे प्राणीहिंसा रोखण्यासाठी ‘पेटा’ने आपल्या मायदेशी लक्ष देण्याची अधिक आवश्यकता आहे. भारतात 7 लाख कोटी रुपयांचा दुधाचा व्यवसाय आहे. ‘अमूल’ला 10 कोटी शेतकरी दूध पुरवतात. त्यातील 7 कोटी हे भूमीहीन आहेत. अशा वेळी ‘अमूल’ला गायीचे दूध न घेण्यास सांगणारी ‘पेटा’ 7 कोटी शेतकर्यांसाठी काय करणार आहे, हे त्यांनी प्रथम सांगावे ? गायीचे दूध केवळ 45 रुपये लिटरने मिळत असतांना सुमारे 400 रुपये लिटर दराचे ‘वेगन मिल्क’ भारतीय जनतेला परवडेल का?